पालघर : गेल्या महिन्यात ओमान समुद्रकिनाऱ्यावर कंटेनर भरलेले जहाज बुडाल्याने अरबी समुद्रात कंटेनर वाहून गेले होते. त्यातील पालघर तालुक्यातील सातपाटी समुद्र किनाऱ्यावर दोन व शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर एक असे एकूण तीन कंटेनर वाहून आले आहेत.
गेल्या महिन्यात ओमानच्या समुद्रात ‘एम. व्ही. फोनिक्स १५’ हे जहाज बुडाल्यामुळे अनेक कंटेनर अरबी समुद्रात वाहून आले होते. त्यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाने पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांना मासेमारी करताना या तरंगणाऱ्या कंटेनरपासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. हे कंटेनर अर्धवट बुडलेले असल्याने मासेमारी करणाऱ्या बोटींना ते धोकादायक ठरू शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात आली होती.
काल रात्री सातपाटी आणि शिरगाव येथील मच्छीमार बांधवांना समुद्रात सुमारे पाच ते सहा नॉटिकल मैलांवर हे कंटेनर तरंगताना दिसले. सातपाटी पोलीस स्टेशनने तत्काळ या घटनेची दखल घेत सर्व ग्रामस्थ आणि मच्छीमार बांधवांना सतर्क राहण्यास सांगितले होते. हे कंटेनर माहिम, शिरगाव आणि सातपाटीच्या दिशेने येऊ शकतात, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली होती.
या इशाऱ्यानंतर आज पहाटे ते कंटेनर सातपाटी व शिरगावच्या उसबाव समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आहेत. हे कंटेनर किनाऱ्यावर लागल्यामुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छीमारांच्या बोटींसाठी तर हे कंटेनर धोकादायक आहेतच, पण आता किनाऱ्यावरही त्यांच्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.
सध्या हे कंटेनर नेमके कोणत्या प्रकारचे आहेत, कुठून आले आहेत, त्यांच्यात काय आहे आणि ते किनाऱ्यावर कसे काढायचे, याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तपास करत आहेत. समुद्राला भरती असल्यामुळे कंटेनर पर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. मच्छीमार आणि प्रशासनाच्या समन्वयाने या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे. या घटनेमुळे समुद्रातील प्रवासादरम्यान सतर्कता बाळगणे महत्वाचे आहे.