विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न
वसई : पालघर जिल्ह्यात ३३४ एक शिक्षकी शाळा सुरू आहे. एका शिक्षकावर एका शाळेची जबाबदारी आल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे कसे दिले जाईल, असा प्रशद्ब्रा उपस्थित झाला आहे. शिक्षण संचालकांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे.
करोना वैश्विाक महामारीने शिक्षण प्रणालीचे धिंडवडे निघाले आहेत. करोनाकाळात बंद असलेल्या शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत. शिक्षणाचा गाडा सुरू राहावा यासाठी काही खासगी शाळा ऑनलाइन पद्धतीने डिजिटल शाळा भरवत आहेत. पण त्यातही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर शासकीय शाळांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. या शाळांच्या बाबतीत अजूनही शासनाकडून कोणतेही निर्णय घेतले गेलेले नाहीत. केवळ ऑनलाइन शिकवण्याचे आदेश दिले आहेत. पण मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा मोठा अभाव असल्याने शासकीय शाळा डिजिटल शाळांच्या प्रवाहातून बाहेर पडत आहेत.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या अहवालानुसार पालघर जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या एकूण तीन हजार ४७४ शाळा आहेत. यातील ३३४ शासकीय शाळा एक शिक्षकी शाळा आहेत तर दोन विनाअनुदानित अशा एकूण ३३६ शाळा आहेत. प्रत्येक शाळेत केवळ एक शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. जिल्ह्यातील एकूण शाळेच्या प्रमाणात ९.६७ टक्के शाळा या केवळ एका शिक्षकावर चालत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांत राज्यातील एकूण शाळांच्या प्रमाणात नऊ टक्के शाळा या एक शिक्षकी आहेत. याचप्रमाणे दोन शिक्षक असलेल्या शाळांचा आकडा त्यापेक्षाही अधिक आहे. एकशिक्षकी असलेल्या बहुतांश शाळा या शासकीय असून ग्रामीण भागांतील आहेत. यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.