पालघर: पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या वाडा कोलम, डहाणू घोलवड येथील चिकू, बहाडोलीचे जांभूळ, भात शेती, पावसाळ्यात उपलब्ध होणारा रानभाज्या व रानमेवा यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी हातभार लागू शकतो. याकरिता जिल्हासह राज्यात सर्वत्र जिल्ह्यातील कृषी क्षेत्राशी संबंधित वस्तूंचा प्रसार व प्रचार करून जिल्ह्याकरिता कृषी पर्यटन वाढवणे गरजेचे झाले आहे. तसेच शासनाकडून कृषी पर्यटन केंद्रकरीता अर्थसाह्य देखील उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
१६ मे रोजी जागतिक स्तरावर कृषी पर्यटन दिवस साजरा केला जातो. शेती आणि ग्रामीण भागातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन आवश्यक आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि पर्यटकांना अनोखा अनुभव मिळेल.
पालघर जिल्ह्यात भात, चिकू आणि जांभुळ ही प्रमुख शेती पिकं आहेत. याव्यतिरिक्त, काही ठिकाणी जव्हार मोखाडा भागात नाचणी, बाजरी, तूर आणि इतर पिकांचीही लागवड केली जाते. घोलवड आणि डहाणू भागातील चिकू आणि बहाडोली परिसरातील जांभूळ प्रसिद्ध असून त्याला भौगोलिक मानांकन देखील प्राप्त झाले आहे. यासह काही भागात स्ट्रॉबेरी, लिची, हळद लागवडीचा देखील शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केला आहे. जंगलातील लाकूडफाटा, मध, लाख, बांबू आणि औषधी वनस्पती गोळा करणे यासह इतर फळांची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते.
कृषी-पर्यटन केंद्रांची क्षमता समजून घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये कृषी-पर्यटन धोरण मंजूर केले. कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत करणे आवश्यक आहे. यामध्ये आवश्यक परवानग्या मिळवणे, केंद्र उभारणे आणि पर्यटन स्थळांची योजना बनवणे. कृषी पर्यटनाचे जाहिरात करणे, कृषी पर्यटन धोरण तयार करणे. वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शेतकऱ्यांच्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या कृषी पर्यटन केंद्र उभारू शकतात.
कृषी पर्यटन केंद्राकरिता नोंदणी
यासाठी दोन एकर ते पाच एकरपर्यंत शेती क्षेत्र असलेल्या ठिकाणी राहण्याच्या सोयीसाठी खोल्या आवश्यक असून या ठिकाणी भोजन व्यवस्था व स्वयंपाक घर असावे. http://www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर तसेच प्रादेशिक उपसंचालक, पर्यटन संचालनालय कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कृषी पर्यटन केंद्रासाठी प्रथम नोंदणी शुल्क व नूतनीकरण शुल्क भरता येईल. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटन विकास समिती देखील असणार आहे.
कृषी पर्यटनासाठी शासनाकडून मिळणारे लाभ
नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन धोरण २०१६ मधील प्रोत्साहन योजना राज्य वस्तू व सेवा करामध्ये व विद्युत शुल्कामध्ये सवलत, कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे बॅंक कर्ज, जलसंधारण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या पाणलोट आधारित योजना, शेततळे यासारख्या योजनांसाठी कृषी पर्यटन केंद्रास प्राधान्य देण्यात येईल, ग्रीन हाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड इत्यादींसारख्या योजना उपलब्ध करून दिल्या जातील, आठ खोल्यांपर्यंतच्या केंद्रांसाठी खोल्या आणि सुविधांच्या बांधकामासाठी नगर रचना विभागाच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. आठपेक्षा जास्त खोल्या असलेली केंद्रे व्यावसायिक उपक्रम म्हणून ओळखली जातील आणि त्यासाठी नगर रचना विभागाची परवानगी आवश्यक असेल, कृषी पर्यटन केंद्र चालकांना प्रशिक्षण, खाजगी, शासकीय विपणन व्यवस्थांचा तसेच ऑनलाइन मार्केटिंगचा पर्याय शासनाकडून उपलब्ध करून दिला जात आहे.
ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता यावा याकरिता तसेच पर्यटन वाढीसाठी रिसॉर्टचे रूपांतर कृषी पर्यटन केंद्रात केल्यास योग्य नियोजन आणि सहकार्याने आपण जिल्ह्याला कृषी पर्यटनाच्या माध्यमातून एक नवीन ओळख देऊ शकतो. कृषी पर्यटन पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी एक चांगली संधी आहे. शेतकऱ्यांनी देखील पुढे येऊन शासनाकडून कृषी पर्यटन केंद्राकरिता मिळणाऱ्या अर्थसाहाय्याचा लाभ घ्यावा. – निलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, पालघर