पालघर : पालघर जिल्हा मुख्यालयात संकुलामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निलावी ईमेल आल्याने मुख्यालय संकुलात एकच धावपळ सुरू झाली आहे. आलेला ई- मेल खरा असल्याचे पोलिसांकडून खातर जमा झाल्याने जिल्हा मुख्यालय संकुलातील सर्व इमारती रिकामी करण्यास आरंभ केला आहे.
सकाळी 11:00 वाजल्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात एका निनावी ईमेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हा ई-मेल खोटा असल्याची शक्यता प्रथम दर्शवण्यात आली. मात्र पालघर पोलिसांकडून या ईमेल ची तपासणी केल्यानंतर हा ई-मेल जेनूइन (खरा) असल्याचे समजल्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत झाले.
जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, दोन्ही प्रशासकीय इमारती तसेच जिल्हा परिषद कार्यालय रिकामी करण्यास आरंभ केला असून अधिकारी कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कार्यालयांपासून काही अंतरावर हलवण्यात आले आहे.या सर्व इमारतींच्या ठिकाणी पोलीस बंदोबस वाढवण्यात आला असून रॅपिडक्शन फोर्स, बॉम्ब शोध पथक व इतर पोलिसांची सर्व यंत्रणा कार्यरत झाली आहे. या इमारतीच्या ठिकाणी एनडीआरएफ ला देखील पाचरण करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा संकुलातील इमारती रिकामी करायला घेतल्यानंतर हा एक मॉक ड्रिल (आपत्कालीन परिस्थितीचे रंगीत तालीम) चा प्रकार असावा असे प्रथमतः वर्तवण्यात येत होते. मात्र निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी आपल्या कार्यालयात निनावी ई-मेल आल्याचे दुजोरा दिला आहे. सावधगिरी चा इशारा तसेच आपत्कालीन परिस्थितीच्या आराखड्यानुसार आवश्यक ती पावले उचलली जात असून पालघर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व इतर संबंधित यंत्रणा सतर्क करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषद रद्द
पालघर पोलिसांनी तारापूर येथील एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात मिळवलेल्या यशा संदर्भात आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र अचानक पणे अखेरच्या क्षणी ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. पत्रकार परिषद रद्द करताना कोणतेही कारण दिले नव्हते मात्र जिल्हा मुख्यालय संकुलात निनावी ई-मेल आल्याच्या कारणांवरून हे घडले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
दरम्यान बॉम्ब शोध पथक व पोलिसांकडून संपूर्ण कार्यालयांची कसून तपासणी सुरू झाली असून नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण पसरले आहे.पालघर जिल्ह्यात तारापूर अणुऊर्जा केंद्रासह अनेक महत्त्वपूर्ण आस्थापने असून जिल्हा मुख्यालयाला बॉम्ब ठेवल्याच्या माहितीमुळे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.