पालघर : पालघर शहरात मुख्य रस्त्यांवर तसेच रेल्वे स्टेशन परिसरात होणाऱ्या अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने कायम स्वरूपी अतिक्रमण हटाव पथकाची उभारणी केली असून गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या या कारवाईमुळे प्रमुख रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. आगामी काळात शहरातील प्रमुख चौक व इतर रस्त्यांवरील अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्याचे नगरपरिषदेने योजिले आहे.

पालघर रेल्वे स्टेशन परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडी समस्येवर तोडगा काढण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाची बैठक घेतली होती. पालघर नगरपरिषदेने नो पार्किंग झोन (क्षेत्र) निश्चित केल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू झाली होती. पालघर नगर परिषदेने देखील रस्त्याकडेला बसणारे हॉकर, फळभाजी विक्रेते यांच्याविरुद्ध देखील कारवाई हाती घेतली होती. मात्र आर्थिक वर्षाअखेरीस कर वसुली च्या गडबडीत ही कारवाई काही प्रमाणात मागे पडली.

कर्मचाऱ्यांच्या मर्यादेमुळे नगरपरिषदेची अतिक्रमण विरुद्ध कारवाई थंडावल्याने शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येऊन नागरिकांना व वाहन चालकाला रेल्वे परिसरात जाणे पुन्हा त्रासदायक ठरले होते. त्यामुळे एकीकडे वाहतूक पोलिसांकडून होणारी कारवाई निष्प्रभ ठरत होती.

या संदर्भात पालघर नगरपरिषदेचा नव्याने कार्यभार स्वीकारणारे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी या प्रकरणात लक्ष घालून अतिक्रमण हटवण्यासाठी कायमस्वरूपी पथकाची निर्मिती केली. नगरपरिषदेमध्ये मनुष्यबळाची मर्यादा असल्याने या पथकाच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्यासाठी दररोज वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून आठवड्याभराचे वेळापत्रक तयार केले आहे.

या पथकाने गेल्या काही दिवसांपासून पालघर शहर रस्त्याकडेला होणाऱ्या अतिक्रमणाविरुद्ध कारवाई केल्याने प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण नियंत्रणात आले आहे. या पथकाने प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसर तसेच रेल्वे स्टेशन कडून निघणारे प्रमुख रस्ते मोकळे ठेवावेत असे निर्देश देण्यात आली असून पुढील काही दिवसात शहरातील प्रमुख चौक मोकळ्या करण्याच्या दृष्टीने सूचित करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेतर्फे देण्यात आली.

नगरपरिषदेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे रेल्वे स्टेशन परिसर मोठ्या प्रमाणात मोकळा झाला असून माहीम रोडवर रस्त्यावर बसणाऱ्या फळभाजी विक्रेते तसेच खाद्यपदार्थांच्या हातगाड्या पादचारी मार्गाच्या वर स्थलांतरित झाल्याने या मार्गावरील वाहन चालकाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

टेंभोडे, बोईसर मार्ग दुर्लक्षित

पालघर शहराचा बायपास मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारितीखाली येत असून या मार्गावरील अतिक्रमण कोणी दूर करावे याबाबत नगरपरिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे थेट छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वीर सावरकर चौक या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. नगरपरिषदेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये झालेले अतिक्रमण दूर करण्या चा इरादा व्यक्त केला असला तरी टेंभोडे रोड, कचेरी रोड तसेच जिल्हा मुख्यालय कडे जाणारा रस्त्यावर व चौकांवर झालेले अतिक्रमण दुर्लक्षित राहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर नगर परिषदेने अतिक्रमण आठवड्यासाठी कायमस्वरूपी पथकाची उभारणी केली असून वाहतूक पोलिसांच्या सोबतीने शहरातील रेल्वे स्टेशन परिसर व प्रमुख रस्ते मोकळे ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. – नानासाहेब कामठे, मुख्याधिकारी, पालघर.