पालघर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे उभारण्यात आलेल्या बाडा पोखरण व २९ गावांच्या प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील सुधारणात्मक काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होऊन ही योजना कार्यान्वित होणे अपेक्षित असताना शासकीय व्यवस्थेतील अनास्था तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणीपुरवठा (जलजीवन मिशन) विभागात समन्वयाचा अभाव असल्याने ही योजना आजवर रखडली आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्याचे काम महिन्याभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून अन्यथा नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
डहाणू तालुक्यातील या १७.३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला ऑगस्ट २०२२ मध्ये तांत्रिक मान्यता व सप्टेंबर २०२२ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. डहाणू तालुक्यातील पूर्वेकडील सात तसेच पश्चिमेकडील २३ गावांना पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या सदोष आखणीमुळे योजनेतील अखेरच्या टप्प्यात असणाऱ्या धाकटी डहाणू सह ११ गावांना आवश्यक दाबाने व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नव्हता. यावर तोडगा म्हणून पश्चिमेच्या गावांमध्ये पाण्याच्या वितरण व्यवस्थेत अमुलाग्र बदल करत योजनेतील अखेरच्या टप्प्यातील ११ गावांसाठी स्वतंत्र एक्सप्रेस लाईन उभारण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचबरोबरने २.३० लक्ष लिटरची मुख्य संतुलन टाकी उभारणे, शुद्ध पाण्यासाठी जल वाहिनीची उभारणीकरणे, उंच जलकुंभाची उभारणी करणे, शुद्ध पाण्याचे गुरुत्व वाहिनी उभारणे तसेच अस्तित्वातील उंच जलकुंभांची दुरुस्ती करून त्यांची पाईप असेंबली बदलणे व अस्तित्वातील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करणे रिटेनिंग हॉलचे बांधकाम करणे इत्यादी कामांचे प्रयोजन करण्यात आले असून त्यापैकी सध्या स्थिती ७८ टक्के काम पूर्ण झाली आहेत.
योजनेतील अखेरच्या टप्प्यात असणाऱ्या ११ गावांना स्वतंत्र एक्सप्रेस लाईन द्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी साखरे येथील कालवा परिसरात ११५ मीटर, साखरे परिसरातील खाजगी जागेमधून जलवाहिनी टाकण्यास २० मीटर तसेच वाणगाव परिसरातील एका भागात ५५ मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम प्रलंबित असून त्याचबरोबरनी दोन ठिकाणी जलवाहिनीला रस्ता ओलांडण्यासाठीची कामं प्रलंबित आहेत. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी महिन्याभराचा अवधी मागितला असून या कामांचा पूर्ततेनंतर या पाणीपुरवठा योजनेतील पश्चिमेकडे २३ गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न बहुतांशी मार्गी लागेल अशी शक्यता आहे.
या पाणीपुरवठा योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गावातील टाकीपर्यंत पाणी आणून देणे व टाकी पासून पुढे घरापर्यंत नळ पाणी वितरण व्यवस्था उभारण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत निश्चित करण्यात आली असून या दोन्ही विभागांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे तसेच जिल्हा परिषदेचे जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुधारित नळ पाणी योजनेतील प्रलंबित काम महिनाभरात पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी पुढाकार घेतला असून उर्वरित कामे वेळेत पूर्ण होऊन या योजनेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक गावातील नागरिकाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्याची व्यवस्था आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नळ पाणी वितरण व्यवस्था उभारणाऱ्या ठेकेदाराकडून हलगर्जीपणा व दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला नोटीस देऊन काम बंद करण्याचे आदेश काढण्यात येतील असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. यामुळे आगामी गणेशोत्सवापर्यंत डहाणू तालुक्यातील पश्चिमेकडे २३ गावांना दररोज नियमितपणे पाणीपुरवठा होण्याच्या आशा पल्लवीत झाले आहेत.
सुधारित योजनेतील वाढीव कामे
तारापूर बायपास पाईपलाईन सुधारित करून घेणे, अस्तित्वातील २.३० लक्ष लिटर मुख्य संतुलन टाकीच्या आरसीसी शिड्या कमकुवत झाल्याने नवीन लोखंडी शिडीची तरतूद करणे, इलेक्ट्रिकल सर्किट ब्रेकरची तरतूद करणे, आसनगाव, वासगाव व चंडीगाव येथे जुना जलकुंभ तोडून नवीन जलकुंभाची तरतूद करणे तसेच जलशुद्धीकरण केंद्र जोड रस्ता उभारणी करण्याचे काम प्रलंबित राहिले आहे.
योजनेची सद्यस्थिती
११ उंच जलकुंभाचे आरसीसी काम पूर्ण, तीन जलकुंभाचे काम प्रगतीपथावर
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून ८३४८ मीटर एचडीपई पाईप पुरवठा करण्यात आला असून ७८९८ मीटर पाईप टाकण्यात आले आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १६० मिलिमीटर व्यासाचा पाईपच्या अतिरिक्त पुरवठा झाला असून ४७४३ मिटर लांबीचे काम पूर्ण झाले असून ३०० मीटरचे काम अपूर्ण राहिले आहे.
अस्तित्वातील सात उंच जलकुंभाची दुरुस्तीचे काम व या जलकुंभच्या पाईप असेंबली बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे, पुढील काम प्रगतीपथावर आहेत. पंप हाऊसच्या स्लॅबचे वॉटरप्रूफिंग प्लास्टरचे काम पूर्ण झाले असून सॅन्ड फिल्टर व फिल्टरचे व्हॉल्व बदलण्यात आले आहेत.