बोईसर : पालघर तालुक्यातील मुरबे येथील प्रस्तावित बहुउद्देशीय बंदराच्या सर्वेक्षणास स्थानिकानी जोरदार विरोध दर्शविला आहे. स्थानिकांचा विरोध डावलून विकासक जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून बेकायदेशीरपणे बंदराचे सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी या विरोधात तारापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.
मुरबे येथील प्रस्तावित बहुउद्देशीय बंदराच्या उभारणीसाठी विकासक जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत समुद्रात प्राथमिक सर्वेक्षणाचे काम गुपचूपपणे सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नजिकच्या मुरबे, सातपाटी, नांदगाव, आलेवाडी, दांडी या ग्रामपंचायती, मच्छीमार संस्था, नागरिक यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा त्यांना विश्वासात न घेता कंपनीने सातपाटी येथील काही मच्छीमारांना हाताशी धरून त्यांच्या बोटीच्या सहाय्याने खोल समुद्रात परस्पर प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरू केल्याचा आरोप केला आहे. या सर्वेक्षणाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून किनारपट्टीवरील मुरबे येथील जयेश गावड, नांदगावचे उपसरपंच धीरज गावड, अँड. विद्युत मोरे, आणि सातपाटीचे उपसरपंच अभिजीत तरे, रुपेश म्हात्रे, रितेश पागधरे यांच्या शिष्टमंडळाने सातपाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश जाधव यांची भेट घेऊन सर्वेक्षणाविरोधात तक्रार अर्ज देत बेकायदा सर्वेक्षणाचे काम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मुरबे गावासमोर बहुउद्देशीय व्यापारी बंदर उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सागरी मंडळाने मंजूर केला आहे. महाकाय वाढवण बंदर पाठोपाठ मुरबे बंदर उभारणीच्या हालचालींमुळे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी क्षेत्रात याविरोधात तीव पडसाद उमटत असून शासन मच्छीमार समाजाला उध्वस्त करीत असल्याची भावना मच्छीमार समाज तसेच किनारपट्टीच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये उफाळून आली आहे. सातपाटी नैसर्गिक बंदरालगत मुरबे किनाऱ्यावर बंदरासाठी ब्रेक वॉटर बंधारे उभारण्याचे प्रस्तावित असून यामुळे प्रस्तावित मुरबे बंदराच्या दक्षिण आणि उत्तर दिशेच्या किनारपट्टीच्या गावांमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरून मच्छीमारांच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच प्रस्तावित मुरबे बंदराची उभारणी आणि मालवाहू जहाजांच्या वाहतुकीमुळे सातपाटी, शिरगाव, वडराई, दांडी, उच्छळी या गावातील सुरू असलेल्या मासेमारीवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून नजीकच असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि भाभा अनुसंशोधन केंद्र राष्ट्रीय अतिसंवेदनशील प्रकल्पांना धोका निर्माण होणार असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
बंदरासाठी समुद्रकिनाऱ्यावरील ५९४ एकर जागा :
जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने दांडी व सातपाटी खाडीदरम्यान मुरबे समुद्रकिनाऱ्यासमोरील २६२२ मीटर लांबीच्या सुमारे ५९४ एकर उथळ खडकाळ क्षेत्रात भराव टाकून बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावाला महाराष्ट्र सागरी मंडळाने ३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे. सर्व प्रकारच्या मालाची आयात, निर्यात करण्याची २५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता असणाऱ्या या प्रकल्पासाठी ४२५९ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
मुरबे येथील जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या बंदरामुळे मच्छीमार व्यवसायावर विपरीत परिणाम होऊन हजारो मच्छीमार बांधवांना फटका बसणार आहे. बंदरामुळे नांदगाव समुद्रकिनारा परिसरातील पर्यटन देखील धोक्यात येणार असून या बंदर उभारणीला आमचा तीव्र विरोध असल्याची माहिती नांदगाव ग्रामपंचायत उपसरपंच धीरज गावड यांनी दिली