पालघर : बोईसर या मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून एक खाजगी मैला टँकर कार्यरत असून या टँकरच्या मधील शौचालया मधील मैला उघड्यावर टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांसाठी आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या प्रकरणात ग्रामपंचायतीने संबंधिता विरुद्ध नोटीस बजावली असली तरीही त्याविरुद्ध कारवाई झालेली नाही.
बोईसर ग्रामपंचायत स्वतःच्या मालकीच्या मैला या टँकर मार्फत गोळा केलेले पाणी व मैला शोष खड्ड्यांमध्ये टाकून त्या वर पावडर टाकून खत निर्मिती करीत आहे. तसेच पावसाळ्यात बेटेगाव येथील एका लोक वसाहती मधील एसटीपी प्लांट मध्ये या टँकर मधून गोळा केलेले घरगुती शौचालयातील सांडपाणी विल्हेवाट करण्यासाठी पाठवण्यात येते.
बोईसर येथील वाढती लोकसंख्या पाहता ग्रामपंचायतचा मैला टँकर सहजपणे उपलब्ध होत नसल्याने एका खाजगी व्यक्तीने गेल्या वर्ष- दीड वर्षापासून ही सेवा पुरविण्या सुरूवात केली. मात्र त्यांच्यामार्फत मैला टँकर मधील घाण व सांडपाणी उघड्यावर टाकले जात असून काही प्रसंगी नैसर्गिक नाल्यात पाणी सोडल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतची कडे प्राप्त झाल्या आहेत.
हा विषय २७ जानेवारी २०२५ च्या ग्रामसभेत चर्चेला आला असता उघड्यावर सोडण्यात येणाऱ्या शौचालयाच्या सांडपाणी व घाणीमुळे कुपनलिका तसेच पाण्याचे इतर स्त्रोत्र दूषित होण्याची शक्यता पाहता संबंधित ठेकेदाराला फेब्रुवारी महिन्याच्या आरंभी नोटीस बजावण्यात आली होती. या संदर्भात ग्रामपंचायत पालघर तहसीलदार, गट विकास अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील या संदर्भात पत्र दिले असले तरी संबंधित टँकर विरुद्ध आजवर कारवाई झालेली नाही.
याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधला असता मैला टँकर हा औद्योगिक आस्थापनामध्ये येत नसल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने करावे असे सुचित करण्यात आल्याचे सांगण्यातबा आले. तर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने शौचालयातील मैला उचलण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्था करत असते. जर स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत हे काम केले जात नसल्यास संबंधित ठेकेदाराने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने गोळा केलेल्या मैल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. या खासगी मैला टँकर विरुद्ध कोणी कारवाई करावी या बाबत विविध विभागात स्पष्टता नसल्याने बोईसर मध्ये फिरणारा या मैला टँकर मार्फत गोळा करण्यात येणारे सांडपाणी योग्य पद्धतीने विल्हेवाट होत नसल्याने नागरिकांसाठी आरोग्याची समस्या निर्माण होत आहे.
संबंधित खाजगी मैला टँकर मालकाविरुद्ध ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे. उघड्यावर मैला टाकण्याची कृती थांबवण्याचे सुचित करण्यात आले असून असे कृत्य सुरू राहिल्याचे निदर्शनास आल्यात पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येईल.- कमलेश संखे, ग्रामसेवक बोईसर