पालघर : पालघर नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू झालेली असतानाही, नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून नागरिकांना, विशेषतः महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी देवदर्शनाचे प्रलोभन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन होत असतानाही निवडणूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
४ नोव्हेंबर रोजी पालघर नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. असे असतानाही पालघर नगरपरिषद क्षेत्रातील विविध प्रभागांमधील इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने महिलांना घेऊन देवदर्शनासाठी जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना प्रलोभन देण्याचा हा प्रकार शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, यापूर्वी नवरात्रीच्या शुभपर्वावर देखील नवदुर्गा दर्शन यात्रांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन जिल्हाभर ठिकठिकाणी उमेदवारांकडून आणि राजकीय पक्षांकडून करण्यात आले होते. ग्रामीण भागासह शहरी भागातून येणाऱ्या महिलांची या यात्रांना लक्षणीय उपस्थिती होती. लोकप्रतिनिधींकडून सामूहिक दर्शन यात्रा आयोजित करणे हा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग मानला जात आहे.
पालघर नगरपरिषद क्षेत्रातील विविध देवी-देवतांच्या दर्शनासाठी दरवर्षी खासगी बसेसमधून हजारो महिला यात्रेत सहभागी होत असतात. परंतु, यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी असल्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून अशा सामूहिक दर्शन यात्रांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले गेले आहे. राजकीय पक्षांकडून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी या धार्मिक सहली एक प्रभावी माध्यम म्हणून वापरल्या जात आहेत. विशेषतः महिला गट आणि बचत गटांच्या सदस्यांना प्राधान्य देऊन, त्यांच्यासाठी हे विनामूल्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
आचारसंहितेचे उल्लंघन स्पष्ट
आचारसंहिता लागू झाल्यावरही इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे उमेदवार नागरिकांना देवदर्शनासह महिलांकरिता विविध महिलांचे कार्यक्रमाचे प्रलोभन देत असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन स्पष्टपणे दिसून येत आहे. निवडणूक काळात मतदारांना अशा प्रकारे सामूहिक सहली, दर्शन यात्रा किंवा अन्य स्वरूपाचे प्रलोभन देणे हे नियमांचे उल्लंघन ठरते. सद्यस्थितीत हे प्रकार खुलेआम सुरू असतानाही निवडणूक विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. इच्छुक उमेदवारांच्या या कृतींवर निवडणूक विभाग काय आणि कधी कारवाई करणार, याकडे आता पालघरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
याबाबत निवडणूक विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
