पालघर : पालघर रेल्वे स्थानकाच्या लगत पूर्वे कडील एका खाजगी औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज या कंपनीत झालेल्या रासायनिक स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य चार कामगार जखमी आहेत. या कामगारांना भाजल्याच्या जखमा झाल्या असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

पालघर पूर्वेकडील या उद्योगांमध्ये सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास धातू व आम्ल (ऍसिड) चे मिश्रण करताना अचानकपणे स्फोट झाला. या प्रसंगी कंपनीचे मालक व पाच कामगार घटनास्थळी उपस्थित होते.

या अपघातामध्ये एका स्थानिक कामगाराचा भाजून मृत्यू झाला असून भाजण्याच्या जखमा मोठ्या प्रमाणात असणाऱ्या दोन गंभीर कामगारांना पालघर येथील ढवळे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. थोड्या दूरवर असणारे अन्य दोन कामगारांना पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली असून या दोघांची प्रकृती चिंतेच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येते.

विशेष म्हणजे पोलिसांना या संदर्भातील माहिती सायंकाळी सात वाजल्यानंतर समजली. तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात या अपघाताची माहिती मिळाली नव्हती. पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचून माहिती पुढे आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघाताची प्राथमिक माहिती मिळवत असल्याचे सांगण्यात आले.