बोईसर : पावसाळापूर्व देखभाल दुरुस्ती करण्यास दूर्लक्ष झाल्याने पहिल्याच पावसात चिल्हार बोईसर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची वाताहत झाली आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेने वाहनांचा वेग मंदावला असून अपघाती घटनांत देखील वाढ होत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या चिल्हार बोईसर रस्त्याची पाऊस सुरु होताच अक्षरक्ष दुरवस्था झाली आहे. पंधरा किमी अंतराच्या रस्त्यावर पहिल्याच पावसाने ठिकठीकाणी मोठ्या आकारांचे पडलेले खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. यामुळे वाहनचालकांसह नागरीकाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे.
बोईसर चिल्हार रस्त्याच्या १३ किलोमीटर टप्प्याचे एमआयडीसीकडून २०२१ मध्ये चौपदरीकरण करून संपूर्ण रस्ता नव्याने बनविण्यात आला. या मार्गावरून दैनदिन अंदाजे ३० ते ३५ हजार मालवाहू अवजड वाहने, दुचाकी, खाजगी आणि प्रवासी वाहने धावतात. तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे दिवस-रात्र या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरु असते. जवळपास १०० कोटी खर्चून बनविलेला रस्ता आणि दुभाजकांचे काम ठेकेदार कंपनीकडून दर्जानुसार न करता अनेक ठिकाणी निकृष्ठ करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे अवघ्या तीन ते चार वर्षातच नवीन बनविलेला रस्ता जागोजागी उखडला आहे. या रस्त्यावरील खैरा पाडा, बेटेगाव, मान, वारांगडे, गुंदले, नागझरी नाका, लालोंडे, चरी, वेळगाव, खुटल आणि चिल्हार या गावांच्या हद्दीत पावसाळ्यात अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
मुकुट टंक पेट्रोल पंप, टाटा हाउसिंग, मान, गुंदले दोन बंगला, नागझरी नाका, वेळगाव येथील रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्यामुळे वारंवार खड्डे पडत आहेत. असमतल रस्ता आणि पावसाच्या पाण्याने भरून राहिलेल्या खड्ड्यांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत आहेत.
रस्ते सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष :
तारापुर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर परीसरात लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बोईसरच्या पूर्वेला बेटेगाव, मान आणि वारांगडे भागात मोठ्या प्रमाणात नवीन रहीवासी संकुले उभी राहत आहेत. सोबतच सुपर मार्केट्स, शाळा महाविद्यालये, फर्निचर दुकाने, वाहनांची विक्री दालने सुरू झाल्याने चिल्हार बोईसर रस्त्यावर मालवाहू, खाजगी व प्रवासी वाहनांच्या संख्येत देखील वाढ असून निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यामुळे अपघाती घटना वाढत आहेत. वाढत्या अपघाती घटनांच्या पार्श्वभूमीवर सीलावर्षभरापूर्वी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागामार्फत चिल्हार बोईसर रस्त्यावरील अपघातप्रवण जागांची पाहणी करून एमआयाडीसीला काही तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र एमआयडीसी आणि ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती आणि सुरक्षा उपाययोजना राबविण्याकडे दूर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
चिल्हार बोईसर रस्त्यावर पावसामुळे पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्यास ठेकेदाराला निर्देश दिले असून ठेकेदाराची देखभाल दुरुस्तीची मुदत अजून शिल्लक आहे. – अविनाश संखे, उपअभियंता, तारापूर एमआयडीसी