पालघर : १६ वर्षापूर्वी व्याजाने दिलेल्या रकमेच्या परतफेडीचा धनादेश बाऊन्स झाला होता. या १६ वर्षे जुन्या चेक बाऊन्सच्या खटल्यामध्ये आरोपी यास धनादेशाच्या दुपटीएवढया दंडाची रक्कम फिर्यादीच्या वारसांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. पालघर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ८ जुलै २०२५ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात बोईसर येथील आरोपी जगदीश भिमा जाधव यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

बोईसर येथील परवानाधारक सावकार व मूळ फिर्यादी कै. दोरैया स्वामी नलमाटी यांनी आरोपी जगदीश जाधव यांना एक लाख रुपये व्याजाने दिले होते. या रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने १,८८,४०० रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश अनादरीत (बाऊन्स) झाला. फिर्यादीने आरोपीला कायदेशीर नोटीस पाठवून रकमेची मागणी केली, परंतु आरोपीने रक्कम अदा केली नाही. त्यामुळे, नाईलाजाने फिर्यादी दोरैया स्वामी नलमाटी यांनी पालघर न्यायालयात फौंड्री गुन्हा सण २००९ मध्ये (क्रिमिनल कंप्लेंट एस.सी.सी. नं. ६०३/२००९) दाखल केली.

खटला सुरू असतानाच फिर्यादीचे निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी रामतुलसी दोरैया नलमाटी, मुलगा प्रवीणकुमार नलमाटी आणि विवाहित मुलगी प्रमिलादेवी तुमू या वारसांनी वकिलांमार्फत हा खटला पुढे चालवला. १६ वर्षांच्या सुनावणीनंतर अखेर या केसचा निकाल लागला. न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याचे मत नोंदवले. न्यायालयाने असेही नमूद केले की, आरोपीने इतक्या वर्षांत कधीही सदर रकमेची परतफेड करण्याचा प्रयत्न केला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निकालानुसार, आरोपी जगदीश जाधव यास चेकच्या दुप्पट म्हणजेच एकूण ३,७६,८०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जर आरोपीने हा दंड भरला नाही, तर त्याला तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही निर्धारीत करण्यात आले आहे. आरोपीने दंडाची रक्कम भरणा केल्यास, ती रक्कम फिर्यादीच्या वारसांना नुकसानभरपाई म्हणून अदा करण्यात यावी, असाही महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी फिर्यादीतर्फे ॲड्. धर्मेंद्र पी. भट्ट आणि ॲड्. हेमांगी पाटील यांनी बाजू मांडली.