डहाणू : डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे डहाणू तालुकाध्यक्ष काशिनाथ चौधरी यांनी १६ नोव्हेंबर रोजी आपल्या शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत तालुक्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशामुळे डहाणूतील राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला मोठे खिंडार पडले आहे. त्यांच्यासोबत डहाणू तालुक्यातील कासा, सायवन, कळमदेवीसह शेजारील तलासरी तालुक्याचे तालुकाध्यक्ष आणि अनेक महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी देखील भाजपचा झेंडा हाती घेतला.
काशिनाथ चौधरी हे डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा ग्रामीण भागातील चेहरा म्हणून ओळखले जात होते. माजी जिल्हापरिषद सदस्य असलेले चौधरी यांनी यापूर्वी बांधकाम सभापती पद देखील भूषवले आहे. ग्रामीण भागात त्यांचा जनसंपर्क आणि पकड चांगली असल्याने त्यांचा भाजप प्रवेश पक्षासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशामुळे डहाणू तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आगामी निवडणुकीत याचा मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.
या प्रवेश सोहळ्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौधरी यांच्या प्रवेशाने डहाणू तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढली असून, राष्ट्रवादीसाठी ही मोठी राजकीय हानी मानली जात आहे.
भाजपच्या या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये काशीनाथ चौधरी, माजी डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, डहाणू तालुक्यातील काही पंचायत समिती सदस्य, डहाणू तलासरी मधील अनेक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, डहाणू नगरपरिषदेचे माजी नगरसेवक यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
