पालघर: राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदार यादी अंतिम केल्यानंतर सात महिन्याच्या अवधीत जिल्ह्यात ९१ हजार ७४२ मतदारांची वाढ झालेली दिसून आली आहे. पालघर लोकसभा क्षेत्रातील मतदार संख्या २३.८४ लक्ष इतकी पोहोचली असून नालासोपारा व बोईसर या दोन मतदारसंघात मतदार संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही वाढ महत्वपूर्ण ठरणार असून काही राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवले असल्याचे स्पष्ट होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पालघर लोकसभा क्षेत्रात २२ लक्ष १९ हजार ३३ मतदारांची नोंद होती. मात्र अखेरच्या पंधरा दिवसात त्यामध्ये तब्बल ७७ हजार ३३ मतदारांची वाढ होऊन निवडणुकीसाठी पात्र मतदारांची संख्या २२ लक्ष ९२ हजार ६६ इतकी झाली होती.
काही राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीचा सपाटा सुरुच ठेवला असून निवडणूक विभागातर्फे नवीन मतदाराला देखील नोंदवण्याचे काम सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील मतदार संख्या २३ लक्ष ८३ हजार ८०८ इतकी झाली आहे. या मतदारांमध्ये १२.३१ लक्ष पुरुष मतदार, ११.५३ लक्ष महिला मतदार व २३० तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील मतदार संख्या ६.५१ लक्ष इतकी पोहोचली असून बोईसर विधानसभा क्षेत्रातील मतदार ४.३५ लक्ष इतकी झाली आहे. त्या खालोखाल वसई विधानसभा क्षेत्र (३.६२ लक्ष), विक्रमगड विधानसभा क्षेत्र (३.२३ लक्ष), डहाणू विधानसभा क्षेत्र (३.०९ लक्ष) तर पालघर विधानसभा क्षेत्र (३.०४ लक्ष) आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाल्यानंतरच्या २०४ दिवसात नालासोपारा विधानसभा क्षेत्र ४१९६९ मतदारांची वाढ झाली असून बोईसर विधानसभा क्षेत्रात २३६४० मतदार वाढले आहेत. त्याचबरोबरीने वसई मतदार क्षेत्रात ७७९०, डहाणू विधानसभा क्षेत्र ७६४२, पालघर विधानसभा क्षेत्रात ५५४५ तर विक्रमगड विधानसभा क्षेत्रात ५१५६ मतदार वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुका आणि मतदार वाढ
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी २२ जानेवारी ते ३ मे या काळात दररोज ७२५ मतदारांची वाढ झाली होती. तर निवडणूक काळ जवळ येताच १६ मार्च ते ३ मे दरम्यान मतदारांची सरासरी वाढ ९५७ प्रतिदिन इतकी झाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यानच्या ३६ दिवसात मतदार संख्या ५३१ प्रति दिन ने वाढली तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या दरम्यानच्या १५ दिवसात दररोज तब्बल ४८६९ मतदार वाढल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या १९४ दिवसात पालघर लोकसभा क्षेत्र दररोज ४४८ मतदार वाढल्याचे दिसून आले आहे तर अखेरच्या पंधरावड्यात मतदार वाढीची सादर ३५७ मतदार प्रतिदिन इतका राहिला आहे.
नालासोपारा येथे जलद गतीने मतदान नोंदणी!
१२ मे ते २६ मे या १४ दिवसाच्या कालावधी पालघर लोकसभा क्षेत्रात ५००४ मतदार वाढले असून त्यापैकी तब्बल ३७३५ मतदार हे नालासोपारा विधानसभा क्षेत्र वाढण्याचे दिसून आले आहे. या मतदार संघात दररोज सरासरी २०० पेक्षा अधिक मतदारांची नोंद होत असून या मतदारसंघात जणू मतदार नोंदवण्याची यंत्रणा राजकीय पक्षांनी बसविल्याचा भास होतो.
विधानसभा निहाय मतदार संख्या (२६ मे २०२५)
विधानसभा मतदार
मतदारसंघ एकूण
डहाणू : ३०८८८१
विक्रमगड : ३२२८९७
पालघर : ३०४१२४
बोईसर : ४३४९६९
नालासोपारा : ६६०४९५
वसई :३६२४४२
एकूण : २३८३८०८