पालघर: पालघर जिल्ह्यातील काही विधानसभा क्षेत्रात झपाट्याने वाढणारी मतदार संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच प्राप्त होणाऱ्या अर्जांची पडताळणी करण्यासाठी विशेष मनुष्यबळ कार्यरत केले आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन मतदार नोंदणी करणे, मतदारांचे स्थलांतर करणे तसेच मतदारांची नावे वगळण्याकडे काटेकोर देखरेख राहणार आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पालघर जिल्ह्यातील नालासोपारा विधानसभा क्षेत्रात ४८ हजार पेक्षा अधिक तर बोईसर विधानसभा क्षेत्रात २६ हजार पेक्षा अधिक मतदार वाढले असून उर्वरित चार मतदार संघातील देखील मतदार संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही राजकीय पक्षाने तसेच स्थानिक पातळीवर नव मतदार नोंदणी राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता नव्याने मतदार नोंदणी होत असल्याबद्दलचे आरोप होत असल्याचे वृत्त लोकसत्ता मध्ये प्रकाशित झाले होते.

मतदार संख्या झपाट्याने वाढण्याची बाब जिल्हा निवडणूक विभागाने गांभीर्याने घेतली असून या संदर्भात नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रासह इतर विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान मतदार नोंदणी, स्थलांतर वा कमी करण्यासाठी असणाऱ्या अनुक्रमे नमुना अर्ज क्रमांक सहा, सात व आठ भरण्यासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व पडताळणी याविषयी बीएलओ यांना सविस्तर माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.

याखेरीज नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रासाठी मतदार यादीची तपासणी व नव्याने प्राप्त होणारे मतदार नोंदणी संदर्भातील अर्जांची सत्यता पडताळण्यासाठी दोन स्वतंत्र तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. या तहसीलदारांकडून मतदार यादीतील दुबार नावे व इतर तांत्रिक दोष असल्यास त्याची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे.

या बरोबरीनेच नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी दोन तर उर्वरित चार विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक नायब तहसीलदार यांची नेमणूक निवडणूक विभागात करण्यात आली असून त्यांच्यामार्फत देखील नव्याने प्राप्त झालेल्या मतदार नोंदणीबाबत अथवा नाव वगळण्याबाबत प्राप्त होणाऱ्या अर्जांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. या नायब तहसीलदारांकडून मतदार नोंदणी प्रक्रियेतील प्राप्त होणाऱ्या अर्जांसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व प्रक्रिया पाळली जात आहे का याबाबत पडताळणी केली जाणार आहे.

याच बरोबरीने निवडणूक विभागात नेमलेल्या तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यामार्फत बीएलओ यांच्या कामावर यादृच्छिकपणे देखरेख ठेवण्यात येणार असून त्यामुळे अलीकडच्या काळात झालेल्या मतदार नोंदणी व नव्याने होणारी नोंदणी करताना अधिक दक्षता घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसात पुनर निरीक्षण कार्यक्रम राबविला जाण्याची शक्यता असली तरीही पालघर जिल्ह्याने आपल्या मतदार क्षेत्रातील मतदार याद्या अधिक अचूक राहाव्यात यासाठी जिल्ह्याच्या पुनर निरीक्षण कार्यक्रम स्वतंत्रपणे आरंभ केला आहे.

जिल्हा परिषद निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून याकरिता १ जुलै २०२५ रोजी मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणूक संपल्यापासून जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने विविध ठिकाणी फुगीर मतदार नोंदणी प्रक्रिया राबवली गेली असून पालघर जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या या विशेष जिल्हास्तरीय पुनर निरीक्षण कार्यक्रमाचा जिल्हा परिषदेसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार यादीत किती प्रमाणात फरक पडेल हा प्रश्न मात्र निरुत्तरित राहत आहे.