पालघर : उच्च माध्यमिक परीक्षा बारावीचा निकाल जाहीर झाला असून परीक्षेला बसलेल्या ५० हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी ४६ हजार ७२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालघर जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.१९ टक्के लागला असून मागील वर्षी ९३.५१ टक्के निकाल लागला होता. त्यामुळे निकालात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एक टक्क्याची घट झाली असून मुलांच्या तुलनेत मुली तीन टक्क्यांनी पुढे आहेत.

राज्य मंडळाने आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर केला. पालघर जिल्ह्यातून २७ हजार ५७५ मुले व २३ हजार २९५ मुलीं असे एकूण ५० हजार ८७० विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेकरिता अर्ज भरले होते. त्यातील २७ हजार ४७० मुलं तर २३ हजार २१७ मुली असे एकूण ५० हजार ६८७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील २४ हजार ९३६ मुलं व २१ हजार ७९३ मुली असे ४६ हजार ७२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या अनुषंगाने मुलांचा ९०.७७ टक्के तर मुलींचा ९३.८६ असा एकूण ९२.१९ टक्के जिल्ह्याचा निकाल लागला आहे.

एकूण तालुक्यांच्या तुलनेत मोखाडा तालुक्याचा सर्वाधिक ९६.४४ टक्के निकाल लागला आहे. तर त्यापाठोपाठ तलासरी तालुक्याचा ९५.७२ टक्के, वसई तालुक्याचा ९३.८३ टक्के, वाडा तालुक्याचा ९१.८२ टक्के, पालघर तालुक्याचा ९०.९९ टक्के, विक्रमगड तालुक्याचा ८७.७९ टक्के, जव्हार तालुक्याचा ८६.९२ टक्के तर सर्वात कमी डहाणू तालुक्याचा ८१.९३ टक्के निकाल जाहीर झाला आहे.

यंदा पालघर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.१९ टक्के लागला असून मागील वर्षी ९३.५१ टक्के लागला होता. यंदा एक टक्क्यांनी घट झाली असून मागील वर्षी २०२३ च्या तुलनेत निकालात ३.८६ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर गेल्या दोन वर्षांपासून मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण तीन टक्क्यांहून अधिक आहे.

ग्रामीण भाग अव्वल

मोखाडा तालुक्यातील परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९२८ होती तर त्यातील ८९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मोखाडा तालुक्याचा इतर तालुक्याच्या तुलने ९६.४४ टक्के निकाल लागला आहे. तलासरी येथे २९५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी २८२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तलासरी तालुक्याचा ९५.७२ टक्के निकाल लागला आहे. ग्रामीण भागात परीक्षार्थी संख्या कमी असली तरीही उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सर्वाधिक आहे.

संकेतस्थळाची प्रक्रिया धिम्या गतीने

निकाल घोषित होताच विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले होते. मात्र दरवर्षीप्रमाणे शाळानिहाय, तालुका निहाय, जिल्हा निहाय, विषय व लिंगनिहाय आकडेवारी नुसार माहिती उपलब्ध होताना शिक्षण विभागाला अडीच तासाचा कालावधी लागला. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर एक वाजता निकाल जाहीर झाला असताना जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान माहिती उपलब्ध झाली. विविध प्रकारची माहिती संध्याकाळपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध न झाल्याने अनेक शाळा, शिक्षक आणि प्रतिनिधींमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा निहाय एकूण परीक्षार्थींची संख्या, उत्तीर्णांची टक्केवारी, टॉपर विद्यार्थ्यांची यादी, विषयवार आणि लिंगनिहाय निकाल उपलब्ध न झाल्याने अनेक शाळांना निकालाचे विश्लेषण करण्यात अडचणी आल्या.