वाडा : पालघर जिल्ह्याला ऑक्टोबर महिन्यात अवकाळी आणि मुसळधार पावसाने तीनवेळा झोडपून काढले आहे. याचा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना मोठा फटका बसला असुन शेतकऱ्यांसमोर “अस्मानी संकट” उभे राहिले आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक जास्त भातशेती उध्वस्त झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होवू लागली आहे.

पालघर जिल्ह्यात वाडा, विक्रमगड, डहाणू, पालघर, वसई, जव्हार व मोखाडा या तालुक्यांत यंदा एकूण ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात भातपिकासोबत नागली , वरई, उडीद, तूर, भुईमूग आदी पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक भात आहे. वाडा, विक्रमगड, वसई, पालघर, जव्हार, डहाणू या तालुक्यांत सर्वाधिक भातलागवड तर जव्हार, मोखाडा तालुक्यात नागली व वरई लागवड केली आहे.

सप्टेंबर अखेरनंतर ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने तीन वेळा हजेरी लावली. सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यात गरवे, निम गरवे, हलवे भातपीक आडवे झाले, तर काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याने पिके पूर्णपणे झाकली गेली. परिणामी, भाताचे काड कुजले, धान्य गळून गेले आणि उत्पादन शून्याच्या जवळ पोहोचले आहे. हाता – तोंडाशी आलेले भातपीक पूर्णतः वाया गेल्याने भातशेती संकटात सापडली आहे. बँक, सोसायट्यांकडून शेतीकर्ज फेडायचे कसे, खायचे काय, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, मुलांचे शिक्षण करायचे कसे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडल्याने ते चिंतेत आहेत.

पालघर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात भातपीक कापणी योग्य झाल्याने शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करण्यास सुरुवात केली होती. ती काही दिवसांत पूर्ण होणारच इतक्यातच अवकाळी व मुसळधार पावसाचे विरजण पडले. काही शेतकऱ्यांनी कापणी झालेले पीक वाचविण्यासाठी प्रयत्न केला. २० ते ३० टक्के पीक वाचविण्यास यश जरी आले असले, तरीही आजमितीस अनेक शेतकऱ्यांचे बहुतांशी पीक शेतातच पाण्याखाली पडून राहिल्याने वाचविता आले नाही, परिणामी मोठे नुकसान झाले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील ४६ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांचे १२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रात (१२ ते १५ टक्के) नुकसान झाले होते. यानंतर १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर हे तीन दिवस सलग पाऊस पडल्याने कापलेल्या भात पिकाची जवळपास २५ ते ३० टक्के नासाडी झाली. मात्र, आता मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे हेच प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक पोहचले आहे. या भातशेतीच्या नुकसानीचा महसूल विभागाने तालुका कृषी कार्यालयाकडून प्राथमिक अहवाल मागवण्यात आला असून पंचनामे करण्यात येणार आहेत.
जिल्हा प्रशासनानकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार वाडा व विक्रमगड तालुक्यात २१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४५०० हेक्टर क्षेत्रात भातपिकाचे नुकसान झाले होते. मात्र ऑक्टोबर महिन्यात सलग तीन वेळा पडलेल्या पावसामुळे आता हेच भातपिकाच्या नुकसानीचे प्रमाणात मोठी वाढ झाली असुन ते सर्वेक्षण/ पाहणीअंती आकडा निश्चित सांगता येईल असे वाडा व विक्रमगड तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

वाडा, विक्रमगड तालुक्यात १० ते १२ हेक्टर क्षेत्रात नुकसान-

एका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाडा तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ७ ते ८ हजार हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात भातशेतीचे नुकसान (बाधित क्षेत्र) झाले असल्याची शक्यता वर्तवली आहे. तर विक्रमगड तालुक्यात देखील ७ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. एकंदरीत ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याने यावर्षी भात उत्पादन देखील अत्यल्प असणार आहे.

जिल्ह्यात भातपिकांसह नागली, वरई, उडीद तूर व इतर पिकांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याने पुढे हे नुकसान १०० टक्के होणार आहे. शासनाने तातडीने “ओला दुष्काळ” जाहीर करून विशेष पॅकेज देण्याची मागणी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

पालघर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी देखील विक्रमगड तालुक्यात झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना भेटून शेतकऱ्यांना विशेष मदत करण्यासाठी मागणी करणार असल्याचे सांगितले.

माझ्या शेतात “चार महिने राबून उभे केलेले पिकाची ९० % नासाडी झाली आहे. मी भातशेतीत पूर्णतः उद्ध्वस्त झालो आहे. आता कर्ज फेडायचे कसे, पुढचा हंगाम कसा काढायचा,,” असे वाडा तालुक्यातील व वसुरी बु|| (घोडमाळ) येथील शेतकरी पांडुरंग वामन सांबरे यांनी सांगितले.

तालुके – भात लागवड( हेक्टर)

१. वाडा – १४,३६१.७०
२. विक्रमगड – ७,०२५.१४
३. पालघर – १५,७९८.२३
४. जव्हार – ६,५३६.५६
५. मोखाडा – २,०१८.५०
६. तलासरी – ९,७७७.२६
७. डहाणू – १६,५२१.७५
८. वसई – ७,१०९.७८