बोईसर : पालघर जिल्ह्यात या वर्षीच्या जुलै महिन्यात मागील पाच वर्षातील निचांकी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला असून पुरेशा पावसाअभावी शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. पावसाने ओढ दिली असली तरी प्रमुख धरणांमध्ये मात्र चांगला पाणीसाठा जमा आहे. 

पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी ९०५ मिमी पाऊस पडतो.  मागील पाच वर्षात  सन २०२३ मध्ये सर्वाधिक १५०१ मिमी म्हणजे सरासरीपेक्षा अधिक १६५.९ टक्के पावसाची नोंद झाली होती. तर या वर्षी जुलै महिन्यात सर्वात कमी फक्त ६२६.९ मिमी (६९.३ टक्के) पाऊस पडला  असून मागील पाच वर्षातील सर्वात कमी पाऊस आहे.  जिल्ह्यात मान्सून हंगामाच्या प्रारंभी जून महिन्यात दमदार पाऊस झाला.

जून महिन्यात सरासरी ४११.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना सरासरीपेक्षा अधिक सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक  ५६६.९ मिमी (१४० टक्के) पाऊस झाल्याने नदी, नाले, ओहोळाना पूर येऊन प्रमुख धरणे आणि बंधारे तुडुंब भरल्याने धरणांचे दरवाजे उघडण्याची वेळ आली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसाचा जोर कायम होता, मात्र त्या नंतर आठ जुलै पासून २० जुलै पर्यंत पाऊस गायब झाला होता. जुलै महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात हलक्या  ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने भाताच्या रोपणीसाठी पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्याना दिलासा मिळाला.

भात लावणी अंतिम टप्प्यात :

पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ७८६३५ हेक्टर क्षेत्रफळावर भाताची लागवड केली जाते.  डहाणू तालुक्यात सर्वाधिक १६५२० हेक्टर भात लागवडीखालील क्षेत्र असून मोखाडा तालुक्यात सर्वात कमी २०१५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. जिल्ह्यात खरीप हंगामात जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.  मात्र आठ ते २० जुलै दरम्यान पावसाने दडी मारल्याने शेतकरी काळजीत पडला होता, परंतु त्यानंतर दररोज हलक्या स्वरूपाच पाऊस होत असून यामुळे भात पिकाला जीवनदान मिळाले आहे. जिल्ह्यात  ७८६३५ हेक्टर क्षेत्रफळापैंकी ६४९१८ हेक्टर क्षेत्रफळावर भात लागवड (८२ टक्के) पूर्ण करण्यात आली  लावणी लवकर पूर्ण करण्याकडे शेतकऱ्याची लगबग सुरु आहे.

धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा :

जून महिन्यात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील धामणी, कवडास, वांद्री, कुर्झे या मुख्य धरणासह वाघ, डोमहिरा, मनोर,माहीम केळवा, देवखोप, रयतळी, खांड, मोहखुर्द या बंधाऱ्यामध्ये एकूण पाणीसाठ्यात झापाट्याने वाढ झाली. या दरम्यान धरणांमधील पाणी पातळी स्थिर राखण्यासाठी पाटबंधारे विभागाने खालच्या बाजूस असलेल्या नदीपात्रांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु केला. धरण क्षेत्रात पाऊस थांबल्यानंतर धरणातील विसर्ग बंद करण्यात आला असून सध्या या सर्व धरणामध्ये ३४१ दलघमी पैकी ३१५ दलघमी म्हणजे एकूण पाणीसाठ्याच्या जवळपास ८५ ते ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.