पालघर : सध्या भात पिकाच्या वाढीचा काळ सुरू असून पावसाळी वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिकरीत्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी भातशेतात ‘पक्षी थांबे’ उभारावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यातून आदिवासी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. मात्र भात पीक वाढीचा काळ सुरू झाल्यानंतर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे अनेकदा पिकांवर कीटकनाशकांचा फवारा करावा लागतो. मात्र नैसर्गिकरीत्या पिकांचे संरक्षण करावयाचे असल्यास शेतात ठिकठिकाणी पक्षी थांबे उभारण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पक्षी पिकांचे नुकसान न करता अळ्या व किडी खातात. यामुळे पीक वाचवले जाऊ शकते, असे डॉ. विलास जाधव यांनी व्यक्त केले आहे.
याव्यतिरिक्त पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी शेताजवळ पाण्याची व्यवस्था करणेदेखील फायदेशीर ठरते. लहान पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे शेताच्या एका कोपऱ्यात लहान भांड्यात किंवा डिशमध्ये पाणी ठेवल्यास पक्षी अधिक प्रमाणात आकर्षित होतील. हे नैसर्गिक उपाय अवलंबून, पालघर जिल्ह्यातील शेतकरी भात पिकाचे संरक्षण करू शकतात आणि रसायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता चांगले उत्पादन मिळवू शकतात.
कीड नियंत्रणासाठी पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची
एकात्मिक कीडनियंत्रणामध्ये पक्ष्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. सुमारे ९० टक्के पक्षी मांसाहारी असून, गायबगळे, वेडा राघू, खाटीक, कोतवाल यांसारखे अनेक पक्षी शेतातील अळ्या आणि कीड वेचून खातात. त्यामुळे पीक संरक्षणात त्यांचा मोठा वाटा असतो.
पक्षी थांब्यांचे महत्त्व
पक्षी थांब्यांमुळे पिकांचे सुमारे २० टक्के नैसर्गिक संरक्षण होऊ शकते, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. या थांब्यांमुळे किडी खाण्यासाठी पक्ष्यांना योग्य जागा मिळते आणि ते पिकांचे नुकसान न करता अळ्या व किडी खातात. पक्षी थांबे हे पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवासासारखे काम करतात, ज्यामुळे शेती परिसंस्थेतील जैवसाखळी मजबूत होते. या नैसर्गिक उपायांमुळे शेतीचा खर्च कमी होतो, तसेच पर्यावरणालाही कोणताही धोका पोहोचत नाही. यामुळे किडींच्या प्रादुर्भावामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळता येते आणि पर्यायाने उत्पादनात वाढ होते.
पक्षी थांबा कसा तयार कराल?
पक्षी थांबा तयार करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी चार ते पाच फूट उंचीची एक काठी घेऊन तिच्या वरच्या टोकाला इंग्रजी ‘टी’ अक्षराप्रमाणे आडवी काठी जोडावी. हे थांबे शेताच्या मध्यभागी किंवा बांधावर उभे करावेत. कृषी विज्ञान केंद्राने भात पिकाच्या प्रत्येक एकरात कमीत कमी दहा पक्षी थांबे उभारण्याचे आवाहन केले आहे. यामुळे प्रत्येक थांब्यावर पक्ष्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा मिळेल आणि ते संपूर्ण शेतातील किडींवर नियंत्रण ठेवू शकतील.