डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधून शेकडो खलाशी कामगार रोजगाराच्या शोधात गुजरात राज्याकडे रवाना झाले आहेत. तुटपुंज्या पगारावर काम करणारे हे खलाशी आपल्या जीवाची पर्वा न करता खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये अधिक पगार आणि चांगल्या सोयी सुविधा मिळत असल्याने पालघर मधील खलाशांचा ओढा गुजरातच्या दिशेने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

पालघर जिल्ह्यात एकूण १८११ मासेमारी बोटी असूनही, येथील खलाशी कामगार गुजरातकडे जात आहेत. महाराष्ट्रात त्यांना १२ ते २० हजार रुपये मासिक पगार मिळतो, तर गुजरातमध्ये हाच पगार त्यांच्या अनुभवानुसार १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत असतो. तसेच त्यांना पावस खर्चासाठी आगाऊ २० ते ३० हजार रुपये देण्यात येत असून मासेमारी चांगली झाल्यास मालकांकडून कामगारांना प्रोत्साहनपर अधिक पैसेही दिले जातात. गुजरातमध्ये काम करताना अनेक महिने गावापासून दूर राहिल्यामुळे त्यांना एकरकमी पगाराची मोठी रक्कम मिळत असून यामुळे आर्थिक नियोजन करणे सोपे होते असे खलाशांनी सांगितले.

पोटाची खळगी भरण्यासाठी जीवावर उदार होऊन मासेमारी करणाऱ्या या खलाशांना समुद्रात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गुजरातमध्ये काम करताना अनेक वेळा छोटे-मोठे अपघात घडतात. काही वेळा मासेमारी बोटी चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यामुळे खलाशांना अटकही होते. मध्यंतरी, कोरोनाकाळात काही खलाशी दोन ते तीन वर्षांसाठी पाकिस्तानच्या कैदेत अडकल्याचे समोर आले होते. त्यांना सोडवण्यासाठी राज्यासह केंद्र शासनाला प्रयत्न करावे लागले.

गुजरात राज्यातील दिव दमण, वेरावल, पोरबंदर, ओखा, वणाकबार सारख्या अनेक बंदरातून मोठ्या मासेमारी बोटी समुद्रात मासेमारी साठी जातात. या बोटींची क्षमता जास्त असून खोल समुद्रात अनेक दिवस मासेमारी करतात. या बोटींवर मोठ्या प्रमाणात खलाशांची गरज असून यासाठी महाराष्ट्रातील खलाशांना आकर्षित केले जाते.

याचवर्षी मार्च महिन्यात वणाकबार बंदरातून मासेमारीसाठी गेलेल्या निराली बोटीचा मासेमारी करून परत येताना अपघात झाला. या बोटीत गुजरातचे तीन आणि महाराष्ट्राचे चार खलाशी होते. बोट उलटल्यानंतर वाचलेले तीन खलाशी एका प्लास्टिकच्या फळीवर तब्बल १८ तास तरंगत होते. या फळीवर एकूण चार जण होते, ज्यात महाराष्ट्रातील तीन आणि गुजरातमधील एक व्यक्ती होती. अचानक आलेल्या मोठ्या लाटेत महाराष्ट्रातील सूरज वळवी यांचा हात सुटला आणि ते वाहून गेले.

दरम्यान, अपघातामुळे बोटीतील साहित्य समुद्रात वाहून गेल्याने, दुसऱ्या एका बोटीतील कामगारांनी अपघाताचा अंदाज बांधत शोध सुरू केला. याच शोधमोहिमेदरम्यान प्लास्टिकच्या फळीवर वाहत जाणारे खलाशी त्यांना सापडले आणि त्यांचा जीव वाचला. काही दिवसांनी सूरज यांचा मृतदेह सापडला, मात्र अजूनही तीन जण बेपत्ता आहेत. केवळ २० ते २५ हजार रुपयांच्या पगारासाठी हे खलाशी आपला जीव धोक्यात घालत असल्याचे भयान वास्तव समोर येत आहे.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील एका खलश्याच्या कुटुंबाला विमा मिळण्यासाठी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अपघातात पाण्यात पडून बेपत्ता खलाश्यांची कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध न झाल्यामुळे सात वर्षानंतर त्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे कायद्यात नमूद असल्याची माहिती देण्यात येत आहे. यामुळे सात वर्षापर्यंत त्यांच्या कुटुंबियांना वाट पाहावी लागणार आहे.

निराली बोटीच्या अपघातात तलासरी तालुक्यातील झाई येथील चार पैकी दोन खलाशी बचावले असून हे दोन खलाशी पुन्हा मासे बोटींवर काम करण्यासाठी रवाना झाले आहेत. तब्बल अठरा तास प्लास्टिकच्या फळीवर पाण्यात तरंगत मृत्यूशी झुंज देणारे ही कामगार पोटासाठी पुन्हा गुजरात कडे रवाना झाले आहेत.

यातील जलाराम वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार “आम्ही लहानपणा पासून मासेमारी व्यवसायात असून, पहिल्यांदाच अपघाताचा सामना करावा लागला आहे. अपघाताच्या भीतीने काम सोडले तर कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. आमच्याकडे थोडीशी शेती आहे त्यावर आमचा उदरनिर्वाह होणे शक्य नसून आम्हाला दुसऱ्या कोणत्याच कामाची आवड अथवा सवय नाही.” अशी माहिती त्यांनी दिली.

डहाणू तालुक्यातील आदिवासी मच्छीमार मोठ्या संख्येने गुजरात आणि केंद्रशासित दिव येथे मासेमारी बोटीवर मासे पकडण्यासाठी जातात. खोल समुद्रात पाकिस्तानची मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सी त्यांना पकडण्याची शक्यता असते. कधी दुर्घटना होऊ शकते. स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपल्या कुटुंबासाठी मासेमारी करायला जाणाऱ्या या माणसांना सुरक्षितता देणे आवश्यक आहे. जर काही दुर्घटना घडली तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारने घेतली पाहिजे. आज डहाणू व आसपास या आदिवासींना रोजगार मिळत नसल्यामुळे ते गुजरातच्या सौराष्ट्र किंवा दिव येथे रोजगारासाठी जातात. त्यांना आपल्या घरापासून लांब जाण्याची खरंतर आवश्यकता पडू नये. त्यांना त्यांच्या गावाच्या जवळपास रोजगार उपलब्ध होईल, अशा स्वरूपाची व्यवस्था असली पाहिजे. – जतिन देसाई, ज्येष्ठ पत्रकार, शांतीदूत (शांती संघटना)