पालघर : कपासे ते केळवे रोड या रस्त्यावर अवघ्या ४०० मीटर अंतरामध्ये पाच गतिरोधक उभारण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांना सातत्याने गेअर बदल करावा लागत असल्याने इंधन वाया जात आहे. तसेच गतीरोधक दिसत नसल्याने अपघात होत आहेत. यामुळे हे गतिरोधक तातडीने हटवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कापसे उड्डाणपूल ते माकुणसार (पूर्व) दरम्यान उभारण्यात आलेले हे पाच गतिरोधक त्यांच्या रचनेमुळे दिसून येत नाहीत. त्यामुळे ते दुचाकीस्वारांसाठी जीवघेणे ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी एका दुचाकीच्या मागे बसलेल्या महिलेचा या गतिरोधकांमुळे दुचाकीवरून पडून अपघात झाला होता. असे प्रसंग येथे वारंवार होत असतात. त्यामुळे आता नागरिकांनी या गतिरोधकांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. ४०० मीटर अंतरावर इतक्या प्रमाणात गतिरोधक टाकण्याचे कारण काय, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.
या गतिरोधकाविरोधात ग्रामस्थांनी आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन गतिरोधक हटविण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या गतिरोधकाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर हे गतिरोधक परवानगीशिवाय टाकण्यात आले आहेत, असा अभिप्राय स्थानिकांपुढे नोंदविला होता. मात्र हे गतिरोधक अद्याप हटविण्यात आलेले नाहीत अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. बेकायदा गतिरोधक कोणासाठी हटविण्यात येत नाहीत, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या सर्व कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस बंदोबस्तात लवकरच कार्यवाही
माकुणसार (पूर्व) भागातील गतिरोधक काढण्याबाबत ‘आमदार आपल्या दारी’ अभियानात तक्रार नोंदविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गतिरोधक निष्काशीत करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळी गेले होते. मात्र स्थानिक रहिवाशांनी गतिरोधक कायम ठेवण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. स्थानिक व ग्रामस्थ यांच्यात यामुळे जोरदार वाद झाल्याने पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच गतिरोधक काढण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अनेक ठिकाणी अनधिकृत गतिरोधक
पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गतिरोधक उभारण्यात आले असून यापैकी बहुतांश ठिकाणी गतिरोधक असल्याबाबत चिन्हांकन अथवा रंगकाम नसल्याने दुचाकी स्वरांचा अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत. अनधिकृत गतिरोधक कोणत्या विभागाने काढावे याबाबत वेगवेगळे विभाग एकमेकांवर जबाबदारी झटकटाना दिसून येते. तर नागरिकांना याबाबत नेमकी कोणाकडे दाद मागावी याची नेमकी माहिती नसल्याने जनता दरबार पद्धतीच्या उपक्रमात असे प्रश्न मांडावे लागतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्चिक असणाऱ्या रंबलर ची उभारणी करण्याकडे देखील टाळाटाळ करत असल्याचे नागरिकांकडून आरोप होत आहेत.
याशिवाय महावितरणकडून केबल टाकण्यासाठी रस्ता क्रॉसिंग करताना केलेल्या खोदकामाचे ठिकाणी रस्त्याची पातळी पूर्ववत न केल्याने नैसर्गिक गतिरोधक तयार झाले असून याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर देखील त्याची दुरुस्ती वेळेत केली जात नाही.
तर अनेक पशुपालकांनी आपली जनावरे मोकळी सोडल्याने वाहन चालकाला गतीरोधकांप्रमाणे अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे.