वाडा : “मनोर – वाडा” मार्गावरील देहर्जे नदीवरील करळगांव व पिंजाळ नदीवरील सापणे येथील पुलांचा संभाव्य धोका लक्षात घेता पालघर जिल्हा प्रशासनाने अवजड वाहतुकीवर बंदी घातली आहे. मात्र असे असतानाही मोठ्या प्रमाणात या मार्गावरील पुलांवरून दगडखाणी, क्रेशर मधील अतिभार वाहनांची वर्दळ सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासनाने अवजड वाहतूक रोखण्यासाठी उपाययोजना केले असल्याचे सांगत आहे. मात्र पाच-सात दिवसांपूर्वी अतिभार वाहतुकीवर अंकुश आणण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार महसूल विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्तिक “दक्षता पथका”कडून सुरू झालेली कारवाई केवळ चार- पाच वाहनांवर करून थंडावली आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ दिखाव्यापूर्तीच होती का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 “वाडा–मनोर” मार्गावरील करळगाव व सापणे  येथील दोन्ही येथील पुल कमकुवत झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने ठरवलेल्या ३४ मेट्रिक टन या वजनमर्यादेपेक्षा अधिक वजनांच्या वाहनांवर वाहतुकीस बंदी घातली आहे. तशा आशयाचे सुचना फलक देखील दोन्ही पुलाजवळ दोन्ही बाजूस लावले आहेत. मात्र तरीही दररोज शेकडोहून अधिक ट्रक ठरवलेल्या वजनमर्यादेपेक्षा अधिक माल भरून धावत (जात) असून, या नियमबाह्य वाहतुकीमुळे दोन्ही पुलांना धोका निर्माण होवु शकतो.

पुलाची धोकादायक स्थिती असताना प्रशासनाने अतिभार वाहतूक रोखणे आवश्यक आहे. मात्र ते होत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. पुल कोसळून पडल्यास याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच मोठ्या ट्रकमधुन (हायवा) माल घेवून जात असताना शासनाला भरलेल्या  रॉयल्टीपेक्षा अधिक मालाची मर्यादेपेक्षा अधिक १५ ते २५ टन वाहतूक होत असल्याने महसूल बुडत आहे. अनेकदा ही खडी किंवा अन्य माल ट्रकमधुन रस्त्यांवर पडत असल्याने रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या इतर वाहनांवर पडून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येतं नाही

अनेकदा रस्त्यावर पडलेल्या लहान खडीमुळे दुचाकी वाहने घसरत आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

महसूल पथकाने मागील आठवड्यात वाडा येथे चार वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, “ही मोहीम केवळ कागदोपत्री व फोटोसेशनसाठीच होती,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे.

वाडा – मनोर “ या मार्गावर दिवसाढवळ्या, रात्रीच्या वेळी अतिभार ट्रक जात असताना या पुलाच्या संरक्षणासाठी नेमणूक केलेले अधिकारी, कर्मचारी मात्र येथे कुठेच दिसून येत नाहीत.

दरम्यान, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे तालुक्यातील दगडखाणी, क्रेशर मालक व अतिभार करणाऱ्या वाहनांशी आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई होताना दिसून येत नाही. कारवाई झालीच तरी ती केवळ कागदावर दिखाव्यापुरतीच होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या दगडखाणी, क्रेशर मधून खडी, पावडर आणि औद्योगिक माल वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते.

स्थानिकांनी महसूल, उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक विभागांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “प्रशासनाने आळा घातला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

अतिभार वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील महसूल भरारी पथकाला निर्देश देत आहे. अवजड वाहतूक रोखणे हे वाहतूक, पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांचे काम असुन त्यांनी अंमलबजावणी करावी.- सुभाष भागडे, निवासी उपजिल्हाधिकारी, तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी, पालघर