पालघर : पालघर जिल्ह्याला नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा लाभल्यामुळे पर्यटकांचे प्रमाण लक्षणीय आहे. जिल्ह्यातील समृद्ध वारशाच्या संवर्धनासह त्याचा प्रसार-प्रचार करणे तसेच एसटी प्रशासनाच्या उत्पन्नात वाढ व्हावी व पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने हेरिटेज वॉकसारखे वेगवेगळे उपक्रम सुरू करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने व एसटी प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
कोकणच्या उत्तर भागात वसलेल्या पालघर जिल्ह्याला पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा व पश्चिमेकडे अरबी समुद्राची किनारपट्टी असा नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. यासह किल्ले, ऐतिहासिक वास्तू, मासेमारी बंदर, निसर्गरम्य समुद्रकिनारे, धबधबे व धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणात असल्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातून पर्यटक पालघर जिल्ह्यात दाखल होत असतात. पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी विविध प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणासह हेरिटेज वॉकसारखे उपक्रम सुरू होणे गरजेचे आहे.
मुंबई व गुजरातकडील पर्यटकांना अनेकदा वाहतूक कोंडीत अनेक तास अडकून राहावे लागते. तर अनेक पर्यटक वाहतूक कोंडीत वेळ वाया जाऊ नये या दृष्टीने रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. अशा वेळी पालघर, डहाणू, केळवे, विरार या स्थानकात उतरल्यावर त्या स्थानकाजवळ प्रसिद्ध असलेली एक-दोन ठिकाणे सोडली तर कुठे फिरायला जायचे याबाबत पर्यटकांमध्ये संभ्रम असतो. अशा वेळी प्रसिद्ध किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे, धार्मिक स्थळ, मासेमारी बंदरे या सर्व गोष्टी नागरिकांना एकाच दिवशी पाहता याव्यात याकरिता जिल्हा प्रशासनाकडून हेरिटेज वॉकही संकल्पना राबविणे आवश्यक आहे.
पालघर जिल्ह्यात येणारे पर्यटक हे बहुतांशी एकदिवसीय पर्यटनासाठी येतात. तर समुद्रकिनारी असणाऱ्या न्याहारी निवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब आठवडाअखेरीस येताना दिसतात. जिल्ह्यातील कोणत्याही भागात आलेला पर्यटक जिल्ह्यात खिळवून ठेवणे व त्याला ऐतिहासिक, धार्मिक व निसर्गरम्य ठिकाणी भेट देता यावी यासाठी पर्यटन सर्किट तयार करणे व त्याचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे. असे झाल्यास एसटी महामंडळाला अथवा खासगी वाहतुकीला चालना मिळून स्थानिक अर्थकारणात सुधारणा होईल. याच बरोबरीने वेगवेगळ्या पर्यटन स्थळी नागरिकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शक (गाईड) तयार केल्यास येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्याचा इतिहास व पार्श्वभूमी समजण्यास लाभ होऊन अशा ठिकाणाबद्दल माहितीचा प्रसार होऊन ही स्थळे अधिक लोकप्रिय होऊ शकतील.
जिल्हा स्थापनेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे पालघरला पर्यटन जिल्हा बनवण्याच्या दृष्टीने अनेक योजना राबवून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. मात्र त्याचे फलित आजवर दिसून आले नसल्याने प्रशासकीय व्यवस्था कागदी घोडे नाचवण्यात दंग असल्याचे जाणवले आहे.
हेरिटेज वाॅक उत्तम पर्याय जिल्हा प्रशासन हे एसटी प्रशासनाच्या सहकार्याने सवलतीच्या दरात हेरिटेज वॉक हा उपक्रम सुरू करून आगाऊ बुकिंग उपलब्ध करून देऊ शकतात. याद्वारे एका ठरावीक ठिकाणावरून प्रवास सुरू करून एका दिवसात अतिशय अल्पदरात अनेक ठिकाणे पर्यटकांना पाहता येऊ शकतात. यासह त्या वाहनामध्ये ठरावीक ठिकाणांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणाबद्दल पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढत असते. यामुळे एसटी प्रशासनाला देखील याचा आर्थिक लाभ होऊ शकतो.
हेरिटेज वॉकमुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबत तेथील स्थानिकांना रोजगार मिळण्यासदेखील मदत होणार आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील अनेक प्रसिद्ध पदार्थ, बचत गट महिलांनी बनवलेली उत्पादने, बोर्डीचे चिकू, बहाडोलीची जांभूळ, ताडगोळे यासह इतर रानमेवा पर्यटकांना आकर्षण ठरू शकते. यासह स्थानिक मार्गदर्शक (गाइड), हॉटेल आणि रेस्टॉरंट्स व इतर छोट्या मोठ्या उद्योग समुदायाला रोजगार आणि आर्थिक विकास साधण्यास मदत होईल. त्यामुळे हे वॉक स्थानिक अर्थव्यवस्थेला व शाश्वत पर्यटनाला फायदेशीर ठरेल.
जिल्ह्यात पाहण्यासारखे काय? पावसाळ्यात जव्हार येथे धुक्यांनी आसपासची गावे आणि टेकड्या झाकून जातात. जव्हार हे वारली पेंटीगसह शिरपामाळ, जव्हार राजवाडा, हनुमान पॉईंट व दाभोसा धबधबासुद्धा प्रसिद्ध आहे. यासह केळवा, माहीम, शिरगाव, सातपाटी, मुरबे, आलेवाडी, नांदगाव, डहाणू, बोर्डी, दातिवरे, एडवण, अर्नाळा, राजोडी हे समुद्रकिनारे, भवानगड, तांदूळवाडी, काळदुर्ग, केळवा, माहीम, वसई किल्ले, काळमांडवी, दाभोसा, हिरडवाडा हे धबधबे, डहाणू येथील श्रीमहालक्ष्मी, विरार येथील श्रीजीवदानी, केळवे येथील श्रीशीतलादेवी, सेंट पीटर चर्च ही धार्मिक स्थळे यासह मासेमारी बंदरे व सर्वात मोठा तारापूर अणुऊर्जा प्रकल्प येथे देखील पर्यटक भेट देऊ शकतात.
ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण आवश्यक
पालघर जिल्ह्यात भवानगड, तांदूळवाडी, काळदुर्ग, केळवा, माहीम किल्ला, भुईकोट किल्ला, तारापूर किल्ला तसेच अनेक लहान-मोठे गड किल्ले प्रसिद्ध आहेत. मात्र अनेक स्थानिक लोकांनासुद्धा याबाबत पुरेशी कल्पना नसल्याने हेरिटेज वॉक या संकल्पनेद्वारे वास्तूचे संरक्षण होणे, स्थळांचे महत्त्व व सौंदर्य अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळू शकते.