बोईसर : पालघर तालुक्यातील वांद्री धरण परिसरातील जंगलात मौल्यवान खैर जातीच्या झाडांची बेकायदा बेसुमार कत्तल करून तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खैरांची कत्तल आणि चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्करांवर कारवाई करण्यास डहाणू वनविभाग आणि वनविकास महामंडळाला अपयश येत आहे.

डहाणू वनविभाग अंतर्गत भाताणे आणि दहिसर तर्फे मनोर वनपरिक्षेत्रातील वांद्री धरण परिसरातील जायशेत, बहिरीफोंडा, गांजे, टकमक किल्ल्याच्या जंगलातून २०० पेक्षा अधिक मौल्यवान खैर जातीच्या झाडांची तस्करांकडून बेकायदा कत्तल आणि तस्करी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक दिवसांपासून गट क्रमांक १४९,१५४, १५५, १५६. १५७, १५८ मधून खैरांची कत्तल करून तस्करी करण्यात येत आहे. वांद्री धरण परिसरातील जंगल हे पावसाळ्यात अधिकच दुर्गम व घनदाट होत असल्याने या भागात पायी गस्त घालण्याकडे वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याचे दूर्लक्ष होते. त्यातच भाताणे आणि दहिसर वनपरिक्षेत्रात पूर्वी स्थानिक गावातील वनमजुरांकडून दुर्गम जंगलात दिवस रात्र पायी गस्त घालून जंगलतोडीवर अंकुश घालून सुरक्षा केली जात होती. मात्र गेले वर्षभरापासून वनमजूर म्हणून काम करणाऱ्या ३० स्थानिक तरुणांना वनविभागाने कामावरून कमी केल्याने दुर्गम जंगलात नियमित पायी गस्त घालण्याचे काम थांबले आहे.

सध्या वन कर्मचाऱ्याकडून नियमितपणे गस्त घातली जात नसल्याने तस्करी करणाऱ्याकडून याचाच फायदा घेऊन बेसुमार खैरतोड केली जात आहे. जायशेत व बहिरीफोंडा परिसरात जाण्यासाठी वांद्री धरणाजवळून एकमेव गाडी रस्ता असून या ठिकाणी तपासणी चौकी आहे. या परिसरात जाण्यासाठी बाहेरील पर्यटक आणि वाहने यांची कसून तपासणी केली जाते. मात्र खैराची मोठ्या प्रमाणात होणारी तस्करी रोखण्यासाठी संबंधित वनपरीक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपयश येत आहे.

खैराचे ओंडके जप्त :

जायशेत हद्दीत ठाकूरपाडा आणि गांजे दरम्यान २० जुलै रोजी वनविकास महामंडळाच्या हद्दीत खैराचे २०० पेक्षा अधिक ओंडके आढळून आले होते. वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी खैराचे ओंडके ताब्यात घेऊन विरार येथील आगारात जमा करण्यात आले आहेत. याप्रकरणी वन गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खैराचा विविध उपयोग :

खैर जातीच्या वृक्षाच्या गाभ्याचा कात बनवण्यासाठी तसेच औषधी उत्पादनांमध्ये वापर केला जातो. यामुळे खैराच्या झाडाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वाढत्या मागणीमुळे खैराच्या झाडांची मोठ्या प्रमाणात बेकायदा कत्तल करून तस्करी केली जाते. त्यामुळे जंगलातील खैर वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत असून खैर वृक्षांची वनविभागाच्या संरक्षित झाडांच्या अधिसूचीत समावेश करण्यात आला आहे. खैराच्या झाडाची वन विभागाच्या परवानगीशिवाय तोड किंवा वाहतूक करणे बेकायदेशीर असून गुन्हेगारी कृत्य समजले जाते.

मागील आठवड्यात वनविभाग डहाणू आणि वनविकास महामंडळ यांनी संयुक्त कारवाई करीत खैराचे ओंडके जप्त करण्याची कारवाई केली आहे. वनपरिक्षेत्र दहिसर, भाताने आणि वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून जंगल परिसरात नियमित गस्त घातली जाते. – निरंजन दिवाकर, उपवन संरक्षक, वनविभाग डहाणू