पालघर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक पालघर आणि एच.एल.एल. लाईफ केअर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ७ एप्रिल २०२५ रोजी ग्रामीण रूग्णालय मोखाडा येथे सुरू झालेल्या महाडायलिसीस सेंटरला ७ जुलै रोजी तीन महिने पूर्ण झाले. या कालावधीत १०० डायलिसीस पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या माध्यमातून महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे.
सध्यस्थितीत जव्हार व मोखाडा तालुक्यांतील एकूण सहा रूग्णांचे येथे नियमितपणे विनामूल्य डायलिसीस होत आहे. या सर्व रूग्णापैकी काहीजण यापूर्वी नाशिक व सेलवास येथे डायलिसीस करून घेत होते. त्यातच दोन महिन्यापूर्वी जव्हारचे डायलिसीस सेंटर बंद झाल्यामुळे तेथील रूग्णांची झालेली अडचण ग्रामीण रूग्णालय मोखाडाच्या या महाडायलिसीस सेंटरमुळे सुटली आहे.
या डायलिसीस सेंटरमध्ये डायलिसिस विभागाचे राज्य प्रमुख जगन्नाथ हल्याळ यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तंत्रज्ञ राम लाड व कनिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र शिंगाडे हे कार्यरत असून त्यांना अधिपरिचारक रोहित गोलवड व परिचर दिपक बरफ हे सहाय्य करत आहेत.
किडनीविकारतज्ज्ञ डॉ. अनुराग शुक्ला यांच्या ऑनलाईन सल्ल्यानुसार व ग्रामीण रूग्णालय मोखाडा येथील तात्काळ विभागातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक डायलिसीस पार पडत आहे. प्रयोग शाळेतील चाचण्यासाठी हिंद लॅब जव्हार व रक्तासाठी कुटीर रूग्णालय जव्हार येथिल रक्तपेढीचे सहाय्य लाभत असून मोखाडा सारख्या अतिदुर्गम भागात किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध असलेली ही डायलिसीस सारखी महत्वाची व जीवनावश्यक आरोग्य सुविधा वरदान ठरली आहे.
२ जुलै रोजी येथे १०० वे डायलिसीस सेशन यशस्वीपणे पार पडले. याबद्दल महाडायलिसीस सेंटर मध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.