पालघर : पालघर शहरानजीकच्या रस्त्यांवर वाढलेल्या अनधिकृत हातगाड्या आणि अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर गेल्या काही महिन्यांपासून नगर परिषदेकडून कारवाई सुरू आहे. फेरीवाले व हॉकर्स यांना सक्त ताकीद देऊन देखील ते काही दिवसांनी पुन्हा हातगाडी थाटत असल्याने नगरपरिषदेचे अधिकारी आता सतत हातगाडी हटाव मोहीम चालवताना दिसत आहेत.

पालघर रेल्वे स्टेशन कडे येणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचे चित्र आता वाढले आहेत. हातगाड्या हॉकर्समुळे रस्ता अरुंद झाल्या आहे. रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण दूर करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने कायमस्वरूपी अतिक्रमण हटाव पथकाची स्थापना केली असून गेल्या काही दिवसांपासून या पथकाने अनधिकृत हातगाड्यांवरील भाजीपाला, फळे आणि इतर वस्तू विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

पालघर जिल्ह्याचे ठिकाण असूनही विशेषतः स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला होता. पालघर नगर परिषदेने ‘नो पार्किंग झोन’ निश्चित केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कठोर अंमलबजावणी सुरू केली होती. तसेच नगरपरिषदेने वाहतूक पोलिसांना जॅमर दिले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांविरुद्धही कारवाई सुरू झाली होती, मात्र ती नंतर थंडावली होती. आता पुन्हा एकदा या कारवाईला गती मिळाली आहे. नगरपरिषदेने पोलिसांकडून वेळोवेळी बंदोबस्त मिळाल्यास ही कारवाई अशीच सुरू ठेवण्याची ग्वाही दिली आहे.

पालघर नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी ही कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अतिक्रमण पथकाची कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे. नगर परिषदेकडे मनुष्यबळाची मर्यादा असल्याने या पथकाच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्यासाठी दररोज वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून आठवड्याभराचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा हातगाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात असली तरी अनेक स्थानिक भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर एका मर्यादेपर्यंत भाजी विक्रीचा ठेला लावण्याची मुभा दिल्याचेही दिसून येत आहे.

नागरिकांची मागणी

पालघरमधील नागरिक आणि काही संस्थांकडून वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सूचना पुढे येत आहेत. यामध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा, भाजी विक्रेत्यांसाठी चौकोनी बॉक्स, खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकरिता विशेष पार्किंग अशा प्रकारच्या उपयोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. यासाठी नगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत पालघर नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी भाग्योदय परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता ही कारवाई अशी सुरू राहणार असून याकरिता नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.