पालघर : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींची यादी एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आली होती. पावसाळ्यापूर्वी इमारत कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी पालघर नगरपरिषदेने धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली होती. मात्र त्याविरुद्ध पुढील कारवाई झाली नव्हती. विरार येथे इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडल्यानंतर शहरातील अनधिकृत इमारतीविरुद्ध नगरपरिषद कायद्यातील नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करण्यास प्रारंभ केला जाणार आहे.

पालघर नगरपरिषदेतर्फे अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य इमारती रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती प्रवर्गात मोडणार्‍या इमारती तसेच इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गातील इमारती अशा एकूण ८९ इमारतींची यादी वृत्तपत्रात ११ एप्रिल २०२५ रोजी जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केली. अतिधोकादायक राहण्यास अयोग्य इमारती त्वरित निष्कासीत करून त्यावर कारवाई करण्यास नगरपरिषदेतर्फे प्राधान्य देण्यात येणार आहे.

राहण्यास अयोग्य अशा ४९ इमारतींच्या यादीत प्रामुख्याने नंदाभुवन, कमलापार्क मधील लक्ष्मीदर्शन, लक्ष्मीकृपा, लक्ष्मीप्रिया, लक्ष्मीछाया, विजयनगर या इमारती, रेल्वे स्टेशनसमोर नॅशनल ज्वेलर्सची इमारत, बु्जवासी हॉटेलच्या इमारतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये पालघर रेल्वे स्टेशन समोरील पालघर नगरपरिषदेची पूर्वीची इमारत, पालघर नगरपरिषदेच्या मालकीची आणि विद्यमान बीएसएनएल कार्यालय असलेली इमारत आरोग्य पथक-माता बाल संगोपन केंद्र, श्रीरामनगर येथील इमारत, जिल्हा परिषद एस.एम. मराठी मिशन शाळा या शासकीय इमारतींचा समावेश आहे.

इमारती रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करण्यायोग्य २५ इमारती असून इमारती रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक असणार्‍या १५ इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विरार येथे इमारत कोसळण्याची दुर्घटना झाल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला अशा धोकादायक इमारती विरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र असणाऱ्या धोकादायक इमारतींचा आढावा घेण्यात येणार असून गणेशोत्सव संपल्यानंतर अशा इमारतींना निष्काशीत करणे, रिकामी करून दुरुस्त करणे अथवा रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करण्याचे आदेशित करण्यात येणार आहे.

या संदर्भात पालघरचे मुख्यधिकारी नानासाहेब कामठे यांच्याशी संपर्क साधला असता पालघर शहरातील धोकादायक इमारतींना यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गणेशोत्सव सरल्यानंतर अशा धोकादायक वस्तुंना अंतिम नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यास आरंभ करण्यात येतील असे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले.

नगरपरिषदेचे जुने कार्यालय धोकादायक

पालघर नगर परिषदेचे ग्रामपंचायत काळापासून (१९६० च्या सुमारास उभारणी झालेल्या इमारतीत) असलेले कार्यालय इमारत धोकादायक असून नगरपरिषदेने आपला कारभार अग्निशमन विभागाच्या कार्यालयात काही वर्षांपूर्वी स्थलांतरित केला आहे. नगर परिषदेच्या नवीन कार्यालयीन इमारतीचे बांधकाम सुरू असून अग्निशमन विभागाच्या लगत नवीन कार्यालय उभे राहणार आहे.

दरम्यान नगरपरिषद कार्यालयाच्या जुना इमारतीमधील सुमारे ३२ भाडेतत्त्वावर देण्यात आलेले गाळे आहेत (दोन दुकाने प्रयेकी ३१५ व २१० चौरस फूट, एक दुकान ६४ चौरस फूट व २७ भाजीपाला, फळ व फुल विक्रेते गाळे २४ ते ३० चौरस फूट क्षेत्रफळाचे) यांनी नगरपरिषदची इमारत सोडण्यास नकार दिला आहे. त्यांचे अनेक वर्षांपासून असणारे हक्क अबाधित ठेवण्यासाठी कोसळलेल्या विरार इमारतीमधील रहिवाशांना ज्याप्रमाणे भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले त्या धर्तीवर आगामी काळात नगर परिषदेतर्फे भोगवटा प्रमाणपत्र देऊन आगामी काळात नागरपरिषदेतर्फे बांधण्यात येणाऱ्या वाणिज्य वापराच्या संकुलात त्यांना अग्रक्रम मिळण्यासाठी असे दाखले देण्याची तयारी नगर परिषदेने दाखवली आहे.