पालघर: पालघर पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या नवली येथील रेल्वे फाटकाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर रोजी नवली भुयारी मार्गातील साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पाण्याच्या प्रवाहासोबत दोन दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

नवली रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर पर्याय म्हणून दिलेल्या भुयारी मार्गातून शेकडो नागरिक दररोज पूर्व पश्चिम प्रवास करतात. मात्र पावसाळ्यामध्ये हा भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गाला ओहोळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भुयारी मार्गातून बाहेर पडताना एक अरुंद पायवाट आहे, ज्याच्या दुतर्फा कोणतेही सुरक्षा कठडे किंवा कंपाउंड नाहीत. यामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यावर दुचाकी वाहून जाण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.

४ सप्टेंबर रोजी एका तरुणाची दुचाकी या पाण्यात वाहून गेली होती. वीरेंद्र पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी क्रेनच्या मदतीने ती बाहेर काढली. याच घटनेनंतर दोनच दिवसांनी ६ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा एक दुचाकी पाण्याच्या प्रवाहात वाहून झाडात अडकली. या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरीही या दोन्ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

नवली येथे प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. प्रशासनाने जून महिन्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र अद्याप सप्टेंबर उजाडला तरीही काम अपूर्णच आहे. या दिरंगाईमुळे नागरिकांना धोकादायक भुयारी मार्गाचा वापर करावा लागत आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी विद्युत दिवेही नाहीत, ज्यामुळे धोका आणखी वाढतो. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि रेल्वे अधिकाऱ्यांचे गांभीर्याने लक्ष नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सफाळे केळवे देखील धोकादायकच

हा प्रश्न केवळ नवलीपुरता मर्यादित नसून, सफाळे आणि केळवे रोड येथील रेल्वे फाटकही योग्य पर्याय न देता बंद करण्यात आल्याने हजारो ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होईल का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने तात्काळ नवली उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी जोर धरत आहे. यामुळे नागरिकांचा जीव वाचेल आणि त्यांची गैरसोयही दूर होईल.