पालघर: आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून आता पालघर जिल्ह्याला एमएच – ६० हि नवीन परिवहन ओळख मिळाली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहन मालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

९ एप्रिल रोजी संपर्कमंत्री या नात्याने पालघर येथे झालेल्या लोकदरबारामध्ये पालघर मधील नागरिकांसाठी लवकरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याची पूर्तता या निमित्ताने होत असून पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला यापुढे परिवहन विषयक कामासाठी वसई -विरार ला जाण्याची आता आवश्यकता भासणार नसल्याने त्यांच्या वेळ, श्रम आणि पैशाची बचत होणार आहे असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. पालघरला ” उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ” मंजूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही केल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले आहेत. या संदर्भातील शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

पालघर परिवहन विभागासाठी १० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये अवजड वाहनांसाठी तसेच सार्वजनिक वाहनांच्या चाचणी करिता ट्रॅक उभारण्याची तरतूद आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याला वसई- विरार पाठोपाठ स्वतंत्र परिवहन (आरटीओ) कार्यालय उपलब्ध होणार आहे. पालघर येथील परिवहन विभागाच्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारत व ट्रक उभारणीचे काम यंदाच्या वर्षात सुरू होईल असेही श्री सरनाईक यांनी लोकदरबारच्या वेळी स्पष्ट केले होते.

एमएच – ६०

९ एप्रिल रोजी झालेल्या लोकदरबाराच्या प्रसंगी पालघर करिता एमएच – ५९ असा क्रमांक देण्यात येईल असे प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले होते. हा क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहराला देण्यात आल्याने पालघर करिता एमएच – ६० हा क्रमांक देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

स्वतंत्र परिवहन कार्यालयामुळे होणार लाभ

पालघर येथे स्वतंत्र परिवहन कार्यालय उभारण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील विविध भागांमधून विरार येथे परिवहन विभागाची परवानगी घेण्यासाठी जावे लागणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहन मालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबरीने पालघर च्या ग्रामीण भागासाठी परिवहन विभागाचे स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने रिक्षा व इतर खासगी वाहतुकीच्या वाहनांमध्ये मान्यतेपक्षा अधिक प्रवासी बसवणे, गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनां कडून नियमांचे उल्लंघन होणे, वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा अधिक ठेवणे तसेच महामार्गावर अथवा अन्य ठिकाणी मार्गिका नियम धाब्यावर बसवून वाहने चालवणे अशा नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर काही प्रमाणात नियंत्रण येईल अशी अपेक्षा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर परिवहन कार्यालयाचे भूमीपूजन १ ऑगस्ट रोजी करणार

पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र कार्यालय मंजूर केल्या नंतर पालघर कार्यालयाचे भूमिपूजन १ ऑगस्ट रोजी करण्यात येईल असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर येथे सांगितले. बोईसर येथे सामुदायिक सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असताना त्यांनी ही घोषणा केली. पालघर कार्यालयाचे भूमिपूजन करण्यासाठी ७० दिवस उपलब्ध असून आरटीओ अधिकारी यांना या भूमिपूजनाच्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्याच्या त्यांनी याप्रसंगी सूचना दिल्या.