पालघर : पालघर पंचायत समिती अंतर्गत तारापूर व उमरोळी या ठिकाणी घोषित झालेल्या पोटनिवडणुकीसाठी संबंधित राजकीय पक्षांमध्ये समन्वय साधला गेल्याने या दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग खुला झाला आहे. तारापूर गणामध्ये स्मिता कामद पवार यांचे १३ मार्च २०२३ रोजी निधन झालेल्या रिक्त पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने त्यांची वैद्यकीय शिक्षण घेणारी किमया कामाद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमरोळीचे पंचायत समिती सदस्य विनोद कृष्णा भावर यांची ऑक्टोबर 2022 मध्ये बिरवाडी सरपंच म्हणून नेमणूक झाल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती या पदावर बहुजन विकास आघाडी तर्फे महेश दामू लडे यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा : बोईसर : तारापूरच्या प्रदूषणाविरोधात खासदार राजेंद्र गावित यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
नव्याने नेमणूक होणाऱ्या पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ अवघ्या वर्षभराचा राहणार असल्याने बहुजन विकास आघाडी तसेच शिवसेना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ही पोटनिवडणूक टाळण्यासाठी प्रयत्न केले होते. या प्रयत्नाला सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य लाभल्याने दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे दिसून आले आहे. उमेदवारी अर्ज यांची छाननी उद्या झाल्यानंतर याबाबतचा निर्णय स्पष्ट होणार आहे.