पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास  नकार

विजय राऊत, लोकसत्ता

कासा : पालघर जिल्ह्यात शासकीय आरोग्य सेवेमध्ये मर्यादा येत असल्याने अनेक गंभीर रुग्ण हे उपचारासाठी गुजरात राज्य व लगतच्या केंद्र शासित प्रदेशात जाताना दिसून येतात. मात्र तेथील प्रशासनाने केंद्र शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सीमेवरील जिल्ह्यातील रुग्णांना नाकारल्याने स्वस्त दरात किंवा मोफत शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचारांपासून येथील रुग्ण वंचित राहत आहेत.

गुजरात राज्याच्या सीमेवर पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, जव्हार तालुके येतात. हृदयरोग, मूत्रिपड , यकृत, कर्करोग अशा अनेक वेगवेगळय़ा व्याधींसाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. परंतु सीमा भागात अद्ययावत रुग्णालये नसल्यामुळे त्यासाठी गुजरात राज्याच्या सीमेवरील भागांतील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. 

महाराष्ट्रातील पालघर, वसई, मुंबई या भागांतील अद्ययावत रुग्णालयांच्या अंतरापेक्षा  सीमेवरील गुजरात व दादरा नगर हवेली  सेलवास, वापी या भागांतील रुग्णालये जवळ व जाण्या-येण्यासाठी सोयीचे आहेत. त्यामुळे या तालुक्यांतील अनेक नागरिक रुग्णांना घेऊन उपचारासाठी या ठिकाणी येतात.  तिथे उपचारासाठी  गेल्यानंतर रुग्णांकडे  पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे कार्ड असूनही ते महाराष्ट्राचे रहिवासी असल्याकारणाने त्यांना  योजनेचा लाभ नाकारला जातो आणि  त्यांना रोखीने बिल भरण्यास सांगितले जाते.  तलासरी, डहाणू, जव्हार या भागातील  बहुतांश नागरिक  दारिद्ररेषेच्या खाली असल्याने त्यांच्याकडे बिल भरण्यास पैसे नसतात आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभही मिळत नाही त्यामुळे अनेकांना उपचाराविना माघारी यावे लागते. त्यामुळे रुग्णांचे उपचारविना हाल होत आहेत.

याबाबत स्थानिक लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य यांनी लक्ष घालून रुग्णांना गुजरातमध्येही पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सीमा भागातील नागरिक करत आहेत.

मी माझ्या आईच्या हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी वापी येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेलो होतो. परंतु तिथे आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे सांगून पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ नाकारण्यात आला. त्यामुळे आम्हाला पुन्हा उपचाराविना यावे लागले.

-नीलेश मालकरी, रुग्णाचा मुलगा, डहाणू