पालघर : सफाळे येथील ओमटेक्स इंडोर स्टेडियममध्ये विविध देशांच्या क्रिकेट संघांनी प्रशिक्षण घेण्याचे प्रकार घडल्यानंतर या सुविधेचा (फॅसिलिटी) लाभ पुणेरी पलटण कबड्डी संघाने प्रशिक्षणासाठी घेतला आहे. २७ ऑगस्टपर्यंत या ठिकाणी कबड्डीचा सराव पुणेरी पलटणच्या २९ खेळाडूंमार्फत होणार असून यादरम्यान तंदुरुस्ती व कौशल्य सराव यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

पुणेरी पलटण संघाची निवड काही दिवसांपूर्वी झाली असून यापैकी निम्मे खेळाडू गेल्या वर्षी या संघातून खेळले होते. मात्र नव्याने संघामध्ये रुजू झालेल्या खेळाडूंना परस्परांमध्ये समन्वय तसेच संघ भावना निर्माण होऊन एकत्रितपणे कबड्डीमधील डावपेजांवर पुढील काही दिवस सराव करण्यात येणार आहे.

पुणेरी पलटण या संघाने यापूर्वी पुणे तसेच बेंगलोर या ठिकाणी सराव शिबिरांचे आयोजन केले होते. मात्र लोकवस्ती व गर्दीपासून दूर असणारे तसेच निसर्गसौंदर्याने नटलेल्या भागात या प्रशिक्षणाचे आयोजन केल्याने या सरावाकडे सर्व खेळाडू १०० टक्के लक्ष केंद्रित करू शकतील असे पुणेरी पलटणचे धोरणात्मक प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे यांनी सांगितले. या खेळाडूंचे सकाळच्या सत्रात तंदुरुस्तीबाबत प्रशिक्षण तर सायंकाळी कबड्डीचा सराव अशी आखणी करण्यात आली असून या संघाचे नेतृत्व असलम इनामदार करीत आहेत. या संघाचे मुख्य प्रशिक्षक अजय ठाकूर व संग्राम मांजरेकर यांच्यामार्फत या खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी १० सहाय्यक कर्मचारी सोबत असून हे प्रशिक्षण पुढील १५ दिवस सुरू राहणार असल्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली. या प्रशिक्षणादरम्यान खेळाडूंच्या आहाराबाबत विशेष लक्ष दिले जाणार असून मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पुणेरी पलटण संघ अधिक दमदार पद्धतीने प्रो कबड्डी स्पर्धेत उतरेल असा आशावाद अशोक शिंदे यांनी व्यक्त केला.

युवा फलटण संघाच्या प्रशिक्षणासाठी हे ठिकाण विचाराधीन

स्वच्छ वातावरणासोबत खेळाडूंना प्रशिक्षणासाठी पोषक असणाऱ्या या इंडस्ट्रियल मध्ये आवश्यक असणाऱ्या बहुतांश बाबी उपलब्ध असून कोणत्याही बाह्य अडथळाविना या ठिकाणी वर्षभर सराव करण्याची सुविधा असल्याने युवा पलटण संघाची वर्षभर प्रशिक्षण करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे अशोक शिंदे यांनी मत प्रदर्शित केले. शहरी भागात उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा सफाळे येथील इंडोर स्टेडियम मध्ये उपलब्ध असल्याने त्याचा लाभ आगामी काळात आमचा संघ व इतर संघ घेतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.