पालघर : कीटकनाशक फवारणी करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला कृषी विभागाकडून दिला जाणारा परवाना आवश्यक असताना पालघर मुख्यालय संकुलातील वेगवेगळ्या इमारतींमध्ये फवारणीचे कंत्राट देताना या महत्त्वपूर्ण अटीला बगल देण्यात आली आहे. यामुळे सिविल अभियांत्रिक पदवीधर सुशिक्षित बेकारांना लाखो रुपयांची काम करण्याची संधी प्राप्त झाली असून पेस्ट कंट्रोल ठेकेदार उपेक्षित राहिले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी प्रशासकीय मुख्य कार्यालय (८,२५,८९६), प्रशासकीय भवन अ (८,३१,०३३), प्रशासकीय भवन ब (८,३८,७८०) व पोलीस अधीक्षक कार्यालय (८,२५,१४०) यांच्या फवारणीकरीता ३७ लक्ष रुपयांच्या निविदा प्रकाशित झाली आहे. कीटकनाशक फवारणी करण्यासाठी कृषी विभागाकडून कीटकनाशक फवारणी परवाना दिला जात असून कोणत्याही ठेकेदाराला कंत्राट मिळवण्यापूर्वी तो संबंधित संस्थेला सादर करणे बंधनकारक केले जाते.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा मुख्यालय संकुलाच्या कीटकनाशक फवारणी संदर्भात निविदा प्रकाशित करताना कीटकनाशक परवाना ही अट नमूद केली नाही. त्याऐवजी प्रसिद्ध झालेल्या फवारणी निविदामध्ये सुशीक्षीत बेरोजगार सिव्हिल हि अट मुख्य अट असल्यामुळे कीटकनाशक परवाना धारक निविदामध्ये भाग घेऊ शकत नाही. काही त्याचे सोयीचे ठेकेदार यांना फायदा व्हावा या उद्देशाने हि जाचक अट ठेवण्यात आली आहे असे आरोप होऊ लागले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा मुख्यालय फवारणी टेंडर मध्ये अटी शर्ती नमूद करताना काही बाबी दुर्लक्षित राहिल्याचे निदर्शनास आले आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने आवश्यक अटींचा समावेश करून पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.