बोईसर : पालघर जिल्ह्यात शेतकऱ्याकडून भात लावणीला सुरवात करण्यात आली असून आत्तापर्यंत १४ टक्के क्षेत्रफळावर भाताची लागवड पूर्ण करण्यात आली आहे. सातत्यपूर्ण पडत असलेल्या पावसामुळे भात लागवडीसाठी अनुकूल वातावरण असून शेतकऱ्यांची लावणी आटोपण्याकडे लगबग सुरु आहे. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना भात लागवड पूर्ण करण्यास व्यत्यय येत आहे
पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ७८६३५ हेक्टर क्षेत्रफळावर शेतकऱ्याकडून भाताची लागवड केली जाते. डहाणू तालुक्यात सर्वाधिक १६५२० हेक्टर भात लागवडीखालील क्षेत्र असून मोखाडा तालुक्यात सर्वात कमी २०१५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. जिल्ह्यात खरीप हंगामात सातत्यपूर्ण पाऊस सुरु असून ७१११ हेक्टर जमिनीवर भाताच्या विविध वाणांची पेरणी करून रोपवाटीका तयार करण्यात आल्या आहेत.
जुलै महिन्याच्या सुरवातीपासून रोवाटीकेतील पूर्ण वाढ झालेली भाताची रोपे खणण्याचे काम सुरु करण्यात आले असून ट्रक्टर आणि नांगराच्या सहाय्याने नांगरणी व चिखलणी केलेल्या शेतामध्ये शेतकरी कुटुंब व मजुरांकरवी लावणीचे काम सुरु करण्यात आली आहे. सात जुलैपर्यंत जिल्ह्यातील आठ तालुक्यांमिळून १११२८ हेक्टर (१४ टक्के) क्षेत्रफळावर भाताची लागवड पूर्ण करण्यात आली असून भात लावणी लवकर पूर्ण करण्याकडे शेतकऱ्याची लगबग सुरु आहे.
भाताची रोपणी आणि लावणी करताना शेतकऱ्याना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातील तरुण सदस्यांचा शेती करण्याकडे कल कमी होत असून त्यामुळे मनुष्यबळाची टंचाई निर्माण झाली आहे. एकाच वेळी सर्व शेतकऱ्यानी भात लावणीचे काम सुरु केल्याने मजुरांची टंचाई निर्माण होऊन मजुरीचे दर वाढले आहेत. दिवसाला ४०० रुपये मजुरी आणि जेवण द्यावे लागत असल्याने मजुरी द्यावी लागत आहे, त्याचबरोबर जमीन नांगरणी साठी ट्रक्टरचे दर देखील तासासाठी ६०० रुपयांच्या पुढे गेल्याने एकूण खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
जिल्ह्यात भात पिकासोबतच जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यांतील डोंगर उतारांवर नागली (नाचणी) ची लागवड केली जाते. नागलीचे खरीप हंगामात सरासरी १२७७८ हेक्टर क्षेत्र लागवडीखालील असून आत्तापर्यंत ११५५ हेक्टर (९ टक्के) क्षेत्रफळावर लागवड पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सातत्यपूर्ण पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी चिखलणी करून भात लावणीच्या कामाला सुरुवात करावी. हळव्या शेत जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता करून ठेवावी. मुसळधार पाऊस सुरू असताना व शेती भरून वाहताना भाताला खतांची मात्रा देऊ नये. रोपे कमी पडल्यास रोहू पद्धतीने बियाणांना मोड आणून त्याची रोपणी केल्यास रोप लवकर तयार होईल. – भरत कुशारे, कृषी शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र