पालघर : आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. जिल्ह्यातील ६२ प्राथमिक शाळांमधील वर्गखोल्या धोकादायक असून विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. जानेवारी २०२४ मध्येच जिल्हा परिषदेने या शाळांना ‘धोकादायक’ घोषित करून त्या पाडण्याचे आदेश दिले होते, तरीही तब्बल पावणेदोन वर्षांपासून यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. विरार मध्ये धोकादायक इमारत कोसळण्याची घटना नुकतीच घडली असून त्याची पुनरावृत्ती होऊ नये.

पालघर जिल्ह्यातील एकूण २९ जिल्हा परिषद शाळांमधील ६२ वर्गखोल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. डहाणू तालुक्यात ४, वसई तालुक्यात ८, वाडा तालुक्यात ३ आणि विक्रमगडमध्ये ४ वर्गखोल्या धोकादायक आहेत. तर मोखाडा तालुक्यातील टाकपाडा, खुद्द मोखाडा, पिंपळपाडा आणि डोल्हारा येथील १७ वर्गखोल्यांची अवस्था बिकट आहे. याशिवाय जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघर तालुक्यात तब्बल २६ वर्गखोल्या अतिशय धोकादायक बनल्या आहेत. या वर्गखोल्यांची छत गळतात, भिंतींना तडे गेले आहेत आणि विद्यार्थ्यांना अशा असुरक्षित परिस्थितीतच शिकावे लागत आहे.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी ३० जानेवारी २०२४ रोजीच या वर्गखोल्यांची पाहणी करून त्या तात्काळ पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला संबंधित विभागांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. जवळपास दोन वर्षांपासून या शाळांच्या दुरुस्तीसाठी किंवा पुनर्बांधणीसाठी निधीची व्यवस्था करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळेच आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना आजही पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

मोखाडा येथील शाळेचा गुंता

मोखाडा येथील एका जुन्या शाळेच्या १० वर्गखोल्यांची अवस्था सर्वाधिक बिकट आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या शाळेच्या नूतनीकरणासाठी जवळपास १ कोटी ५० लाख रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध झाल्याशिवाय १९५९ आणि १९७० सालातील हे जुने बांधकाम पाडता येणार नाही. त्यामुळे मोखाड्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल आजही अंधारात आहे. शिक्षण विभागाकडून तालुक्यात ९९ वर्गखोल्या, स्वयंपाकगृह आणि शौचालये दुरुस्तीसाठी प्रस्तावित केल्याचे सांगितले जाते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. ‘आधी सुविधासंपन्न प्राथमिक शिक्षण द्या’ अशी मागणी पालक करत आहेत. पायाभूत सुविधांची ही दुरवस्था पाहता, शिक्षण विभागाच्या ‘अद्ययावत शिक्षणा’च्या घोषणा पोकळ ठरत आहेत, असेच दिसून येते.

विरार सारखी दुर्घटना उद्भवू नये

विरार येथील रमाबाई अपार्टमेंट ही धोकादायक इमारती कोसळून 26 ऑगस्ट रोजी १७ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अन्य धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. आता अशा धोकादायक शाळांची देखील आकडेवारी पुढे आल्यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न देखील उद्भवत आहे. त्यामुळे या सर्व शाळा व इमारतींवर दुर्घटनेची टांगती तलवार कायम आहे.

जिल्ह्यातील धोकादायक असणाऱ्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आला असून शक्यतो धोकादायक स्थितीत असणाऱ्या वर्गांमध्ये विद्यार्थी बसणार नाही याकडे लक्ष देण्यात येत आहे. दुरुस्तीची प्राथमिकता ठरवून जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद सेस अथवा इतर मार्गातून धोकादायक असणाऱ्या इमारतींची दुरुस्ती अथवा नव्याने बांधकाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर