पालघर : शिक्षण हे समाजाचा आधार आणि भविष्याच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. पालघर जिल्ह्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या आणि नवनवीन मोठ्या प्रकल्पांचे केंद्र बनणाऱ्या प्रदेशात, भावी पिढीला आवश्यक असलेले कुशल, सुजाण आणि शिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची मोठी जबाबदारी शिक्षण विभागावर आणि शिक्षकांवर आहे. तथापि, सद्यस्थिती पाहता, पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता चिंताजनक आहे.

शिक्षकांना अध्यापनासोबतच निवडणूक, जनगणना आणि विद्यार्थ्यांची १०० हून अधिक प्रकारची ऑनलाइन माहिती भरण्याचा प्रचंड प्रशासकीय व्याप असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया कमकुवत राहत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. या वाढत्या कामाच्या ताणामुळे वर्गातील अध्यापन दुर्लक्षित होत असून, पालघर जिल्ह्याला नव्याने येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या शिक्षित मुलांची गरज भागवणे हे आव्हान बनू शकते.

पालघर जिल्ह्यात शिक्षण विभागाने केलेल्या ‘निपुण सर्वेक्षण’ अहवालातून अत्यंत निराशाजनक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील सुमारे १ लाख २० हजार विद्यार्थ्यांपैकी निम्मे विद्यार्थी अजूनही ‘अप्रगत’ स्तरावर आहेत. म्हणजेच, गणित, विज्ञान आणि भाषा विषयांमध्ये अनेक विद्यार्थी अपेक्षित स्तरापेक्षा खूप मागे आहेत. जिल्ह्यातील २,११० शाळांपैकी ३७१ शाळांमध्ये एकही विद्यार्थी ‘निपुण’ नसल्याचे आढळून आले. तसेच, १०६१ शाळांमध्ये ‘निपुण’ विद्यार्थ्यांची संख्या पटसंख्येच्या केवळ १० टक्के किंवा त्याहूनही कमी असल्याचे दिसून आले आहे.

या सर्वेक्षणात केवळ १६ टक्के विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर अपेक्षेनुसार (‘निपुण’ असल्याचे) आढळून आला. ‘निपुण पालघर’ उपक्रमांतर्गत केलेल्या या पडताळणीत ही समस्या ठळकपणे दिसून आली असून, विद्यार्थ्यांचा हा कमी स्तर म्हणजे शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आणि शिक्षकांवरील कामाच्या ताणामुळे आलेल्या अडचणींचे मोठे प्रतीक आहे.

प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त अनेक प्रकारची माहिती संकलित करून ती ऑनलाईन अपलोड करावी लागते. यामध्ये यु-डायस अपडेट, आधार नोंदणी, बँक खाते उघडणे, विविध योजनांची माहिती, पोषण आहार, स्वच्छ विद्यालय, नवसाक्षर सर्वेक्षण आणि निवडणूक-जनगणना संबंधित कामे यांचा समावेश आहे.

शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅप आणि विविध पोर्टल्सवर दररोज धडकणाऱ्या आकस्मिक आदेशांमुळे शिक्षकांचा बहुतांश वेळ मोबाईल आणि लॅपटॉपवर माहिती भरण्यातच खर्च होतो. शिकवण्याऐवजी कागदपत्रे आणि लिंक्स भरण्यातच शिक्षक व मुख्याध्यापकांचा बहुतांश वेळ जात आहे. वर्गात विद्यार्थी समोर बसलेले असतानाही शिक्षकांना ऑनलाइन कामांमुळे स्क्रीनवर अडकावे लागत असून, परिणामी विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष देणे शक्य होत नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

बदलत्या युगात ‘स्मार्ट’ व्हा

या गंभीर स्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांना एक स्पष्ट संदेश दिला आहे. शिक्षणाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार, आजच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर शिक्षकांनी प्रशासकीय कामे करतानाच अध्यापनाला ‘क्वालिटी टाईम’ देणे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ‘स्मार्ट वर्क’ करणे अपेक्षित आहे. शिक्षकांनी आता काळानुसार आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. शिक्षकांना दिलेली सर्व कामे ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि कल्याणाशी संबंधित आहेत. ‘कामाचा व्याप’ ही मानसिकता बदलून, अध्ययन-अध्यापनाव्यतिरिक्त रिक्त वेळेत ही कामे पूर्ण करावीत. शाळा सुटल्यानंतर काही वेळ थांबून ही कामे केल्यास वर्गातील अध्यापन सोपे होईल. यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा स्तर उंचावण्यास मदत होईल. जिल्ह्यात अनेक शाळा व शिक्षकांनी शाळा आणि काम यामध्ये योग्य समतोल राखल्यामुळे ते आदर्श म्हणून प्रकाशझोतात आले आहेत.

सांख्यिकी कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक

शिक्षकांवर वाढत असलेल्या कामाच्या बोजामुळे शिक्षणाचा स्तर खालावत असल्याने, आता सांख्यिकी कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिक्षकांनी केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करावे यासाठी प्रशासनाने निवडणूक, जनगणना व इतर सांख्यिकी संबंधित कामांकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारून या कामांचे नियोजन करावे. या कामांसाठी शिक्षकांना शाळेतून बाहेर पडावे लागत असल्याने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते. सांख्यिकी कामांकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षकांचा बहुतांश वेळ बाहेर खर्च होणार नाही आणि ते वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष देऊ शकतील.

शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन-अध्यापनासोबतच प्रशासकीय कामे ‘स्मार्ट’ पद्धतीने हाताळणे आणि प्रशासनाने सांख्यिकी कामांचा अतिरिक्त भार कमी करणे, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्यास पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर निश्चितच उंचावेल.