पालघर : पालघर लोकसभेअंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्राची लोकसंख्या २३.९६ लाखांच्या पुढे गेली असून विधानसभा निवडणुकीनंतर १.०४ लक्ष मतदार वाढले आहेत. मतदार वाढण्याची गती कायम असून विधानसभा निवडणुकीनंतर नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रांमध्ये वाढणाऱ्या मतदार संख्या अनुक्रमे ४८ हजार व २६ हजारने वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शासनातर्फे कोणती मतदार यादी गृहीत धरली जाईल याविषयी राजकीय पक्षांच्या नेते मंडळींमध्ये संभ्रम असून वाढणारी मतदार संख्या सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.

राष्ट्रीय निवडणूक आयोगातर्फे १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर या चार दिवशी मतदार संख्येचे अंतरीम निश्चितीकरण करण्यात येते. विधानसभा निवडणूक २०२४ च्या प्रसंगी पालघर लोकसभा क्षेत्रात २२.९२ लक्ष मतदार नोंदवले गेले होते. २२ मे व २६ मे २०२५ रोजी पालघर लोकसभा क्षेत्रातील मतदारसंघ अनुक्रमे २३.७९ लक्ष व २२.८४ लक्ष इतकी होती. १ जुलै रोजी मतदार संख्या अंतिमकरण करून संख्या निश्चित करण्यात आली नसून १ ऑगस्ट रोजी पालघरची मतदार संख्या २३.९६ लक्ष पर्यंत पोहोचली आहे. मतदार संख्या निश्चितीकरण प्रक्रिया मे महिन्याच्या व्यतिरिक्त जानेवारी व जुलै २०२५ मध्ये झाली नसल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणती मतदार संख्या व यादी ग्राह्य धरली जाईल याबाबत वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत.

मतदार संख्येत झपाट्याने वाढ

विधानसभा निवडणुकीपासून २६ मे पर्यंत झालेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत ९२ हजार मतदार (दररोज सरासरी ४४१ वाढीच्या दराने) वाढले होते. विशेष म्हणजे १२ मे ते २६ मे या १४ दिवसांच्या कालावधीत तब्बल पाच हजार मतदार (त्यापैकी ३७३५ मतदार नालासोपाऱ्यात) वाढल्याचे दिसून आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर पालघर लोकसभा क्षेत्रात १.०४ लक्ष मतदार वाढले असून त्यापैकी अधिकतर मतदार नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रात झाल्याची दिसून आले आहे. त्या खालोखाल वसई विधानसभा क्षेत्रात ८८६५ मतदार, डहाणू विधानसभा क्षेत्रात ८८०९, पालघर विधानसभा क्षेत्रात ६२४३ तर विक्रमगड विधानसभा क्षेत्रात ५६१३ मतदार वाढल्याचे दिसून आले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पालघर लोकसभा क्षेत्रात दररोज सरासरी ३८० मतदारांची वाढ होत असून नालासोपारा येथे दररोज सरासरी १७६ तर बोईसर येथे ९६ मतदार वाढत असल्याने सर्व प्रमुख राजकीय पक्षांना या मतदार संख्येच्या वाढीबद्दल उत्सुकता तसेच चिंता निर्माण झाली आहे. या तुलनेत २६ मे ते १ ऑगस्ट या ६६ दिवसात १२,२५० इतकीच मतदार संख्या वाढली असून मतदार वाढीचा सरासरी दर प्रतिदिन १८६ इतका मर्यादित राहिला आहे.

डहाणू: ३१००४८

विक्रमगड : ३२३३५४

पालघर: ३०४८२२

बोईसर: ४३७६३२

नालासोपारा: ६५६६८५

वसई: ३६३५१७