पालघर: शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची संख्या कमी करण्यात प्रगती केली आहे. २०२३ च्या तुलनेत गेल्या वर्षी शाळाबाह्य मुलांमध्ये घट नोंदवली गेली आहे. ज्यामुळे शिक्षण विभागाचे ‘शून्य शाळाबाह्य’ मुले करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. तर यावर उपाय म्हणून जिल्हा परिषद शाळांमध्ये माध्यमिकचे वर्ग देखील सुरू करण्यात आले आहे.

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून १ जुलै ते १५ जुलै दरम्यान शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सहा ते १८ वयोगटातील मुलांचा शोध घेण्यात येत आहे. २०२३ मध्ये २५० शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यात आले तर २०२४ मध्ये ही संख्या २३६ इतकी होती. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवीपर्यंतच वर्ग असल्याने नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे शाळाबाह्य प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाने या वर्षीपासून ५७ जिल्हा परिषद शाळांमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग सुरू केले आहेत. यामुळे शाळाबाह्य मुलांचा आकडा शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पालघर जिल्ह्यातील एकही विद्यार्थी मूलभूत शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने शोधमोहीम राबवली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुटुंबे व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर करतात, तर अनेक कुटुंबे कामासाठी जिल्ह्यात येतात. या स्थलांतरामुळे मुलांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात खंड पडतो. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही शोधमोहीम सुरू आहे.

पालघर जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा या आदिवासीबहुल भागातून रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. हे स्थलांतर रोखून शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्वेक्षण कालावधीसाठी तालुकास्तरावर ‘बालरक्षक’ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२०२३ च्या सर्वेक्षणानुसार:

  • एकूण २५० शाळाबाह्य मुले शोधण्यात आली.
  • यामध्ये सहा ते १४ वयोगटातील ७२ मुले, तर १५ ते १८ वयोगटातील १६८ मुलांचा समावेश होता.
  • सर्वाधिक १४५ मुले पालघर तालुक्यातील होती, त्यापाठोपाठ डहाणू आणि मोखाडा तालुक्यातील मुलांचा समावेश होता.

२०२४ च्या सर्वेक्षणानुसार:

  • डहाणू आणि जव्हार या दोनच तालुक्यांमध्ये एकूण २३६ शाळाबाह्य मुले आढळली.
  • यामध्ये सहा ते १४ वयोगटातील १२६ मुले, तर १५ ते १८ वयोगटातील ११० मुलांचा समावेश होता.
  • या सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यात आले आहे.

माध्यमिक वर्गांमध्ये शाळाबाह्य मुलांचे अधिक प्रमाण

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग नसल्याने, आठवीपर्यंत शिक्षण झाल्यावर अनेक विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकत नाहीत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून शाळाबाह्य मुलांमध्ये माध्यमिक वर्गातील मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. तसेच आश्रमशाळांची क्षमता कमी असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणात अडचणी येतात.

५७ शाळांमध्ये नववी-दहावीचे वर्ग सुरू

शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ५७ शाळांमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहजपणे दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेता येणार आहे. शिक्षण विभागाने यामुळे शाळाबाह्य मुलांच्या प्रमाणात १०० टक्के घट होण्याचे ध्येय ठेवले आहे.

शोधमोहीम कुठे राबवली जाणार?

शाळेतील शिक्षक, अंगणवाडी मदतनीस, स्वयंसेवी संस्था आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी वीटभट्ट्या, साखर कारखाने, बांधकाम स्थळे, फूटपाथ, ट्रॅफिक सिग्नल्स, भोजनालये, रेल्वे स्टेशन आणि इतर कोणत्याही ठिकाणाचे सर्वेक्षण करणे अपेक्षित आहे. घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, बाजारपेठ, दगडखाणी, स्थलांतरित कुटुंबे, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षणगृह, विशेष दत्तक संस्था इत्यादी ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यात येत आहेत.

शिक्षण विभागाचे आवाहन

शिक्षण विभागाने नागरिकांना या विशेष शोधमोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेअंतर्गत ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण घेत नाहीत आणि ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालके यांचा शोध घेतला जाईल. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. या शोधमोहीम सर्वेक्षणात शोध घेतलेल्या बालकांची माहिती संबंधित शिक्षकांनी पाठवावी, असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वेक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वेक्षणात आढळलेल्या बालकांना तात्काळ नजीकच्या नियमित शाळेत वयानुरूप वर्गात दाखल करण्यात येत आहे. या सर्वेक्षण मोहिमेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात एकही शाळाबाह्य, अनियमित किंवा स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नसून लवकरच शाळाबाह्य मुलांचा आकडा शून्यावर आणला जाईल. – सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)