पालघर : दिल्ली येथून मुंबई सेंट्रल येथे जाणाऱ्या ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस गाडीच्या ओव्हरहेड वायरच्या संपर्कात वापी स्थानकादरम्यान मोर आला. या गाडीला पालघर येथे ओव्हरहेड वायर बंद करण्याची सुविधा असल्याने थांबा देऊन या मोराची प्राणी मित्रांच्या सहकार्याने सुटका करण्यात आली. मात्र तोपर्यंत या मोराचा मृत्यू झाला होता.

दिल्ली येथून सायंकाळी सव्वा पाच वाजता सुटणारी सुपरफास्ट ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस ही दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचते. आज सकाळी जवळपास आठ वाजताच्या सुमारास ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस वापी स्थानकातून सुटल्यानंतर रेल्वेवर असलेल्या ओव्हरहेड वायरच्या संपर्कात त्या परिसरातील मोर आला. सुपरफास्ट गाडी असल्याने वेग नियंत्रणात येऊ शकला नाही. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्वरित पालघर येथील प्राणीमित्र वैशाली चव्हाण यांना मोराची सुटका करण्याबाबत कळविले.

ही गाडी वलसाड वापी नंतर थेट बोरिवली व मुंबई सेंट्रल येथे थांबा घेत असल्याने पालघर येथे तिला थांबवणे कठीण होते. मात्र मोराची सुटका करण्यासाठी तसेच पालघर स्थानकात ओवर हेड वायर बंद करण्याची सुविधा असल्याने या गाडीला वापी ते पालघर अर्ध्या तासात पोहोचवून फलाट क्रमांक तीनवर सहा मिनिटात करिता थांबा देऊन ओव्हरहेड वायर बंद करण्यात आली. यावेळी प्राणी मित्रांनी त्वरित ओवरहेड वायर मधून मोराची सुटका करण्याकरिता प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत मोराचा मृत्यू झाला होता. तर त्याचे मागचे शरीर जळून गेले होते.

मोराला काढल्यानंतर गाडी बोरिवलीच्या दिशेने निघाली. यानंतर पीपल ऑफ ऍनिमल वेल्फेअरचे कार्यकर्त्यांनी या मोराला पालघर येथील वन विभागाच्या ताब्यात दिले. वन विभागाने याबाबत पंचनामा नोंदवून त्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याला पालघर येथील वन विभागाच्या जागेमध्ये तिरंग्यामध्ये लपेटून त्याला अग्नी देण्यात आला. यावेळी प्राणी मित्र व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

माकडांना खाद्य देणे बंद करा …

पालघर मनोर मार्गावरील वाघोबा खिंडीत हजारोच्या संख्येने माकडं वास्तव्य करत आहेत. या परिसरातून जाणारे येणारे नागरिक अनेकदा इथे थांबून आपल्याकडील खाद्यपदार्थ त्यांना देत असतात. त्यामुळे ते स्वावलंबी न राहिल्याने त्यांना निसर्गाच्या खाद्याचा विसर पडला आहे. तसेच अनेक वेळा रस्त्यात खाद्य टाकल्याने येणाऱ्या वाहनाखाली माकडे येऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात खाद्यपदार्थ टाकू नका अशी मागणी वन विभागाकडून अनेकदा करण्यात आली आहे.

या अगोदर मांजर जातीय एक प्राणी रेल्वेखाली आल्याची घटना घडली होती. मात्र मोराची अशा प्रकारची मृत्यूची घटना पहिल्यांदाच घडली आहे. वाघोबा खिंडीत देखील माकडांचे मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी देखील प्रसंगवधान राखण्याचा प्रयत्न केला. -वैशाली चव्हाण, पीपल ऑफ ॲनिमल वेल्फेअर