कारवाईसाठी कायमस्वरूपी फिरत्या पथकाच्या नेमणुकीची मागणी
पालघर : पालघर नगर परिषदेकडे प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीचा बोजवारा उडाला आहे. नगर परिषदेचे फिरते पथक कायमस्वरूपी नसल्यामुळे अजूनही प्लास्टिकची विक्री आणि वापर खुलेआम सुरू आहे. राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्लास्टिक बंदीची घोषणा केली. सरकारने ५० मायक्रॉनवरील प्लास्टिक बॅग्जना काही अटींवर परवानगी दिली. पण या परवानगीचा चुकीचा अर्थ लावत व्यापारी, विक्रेत्यांनी, दुकानदारांनी बंदी असलेल्या प्लास्टिकची खुलेआम विक्री सुरू केली आहे. मध्यंतरी नगर परिषदेने प्लास्टिक बंदीची मोहीम राबवून लाखो रुपये दंड वसूल केला होता. त्या वेळी प्लास्टिक वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. काही काळ प्लास्टिक बंदी झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पालघरच्या बाजारपेठेत जाऊन कारवाई केली होती. मात्र तेव्हाही प्लास्टिकचा चोरी छुपे वापर सुरूच होता.
आता मात्र प्लास्टिक बंदीच्या नियमांना बगल दिली जात आहे. शहरातील व्यापारी संकुले, किराणा दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा मुक्त वापर करत आहेत. खाद्य विक्रेते, बाजारपेठांमध्येही विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांतून सर्रास वस्तू दिल्या जात आहेत. मटण, मासळी बाजारात चोरटय़ा पद्धतीने प्लास्टिक पिशवी दिली जात आहे. प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर नगर परिषद लक्ष ठेवून असली किंवा अशांवर कारवाई करत असली तरी पथकाची पाठ फिरताच प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर काढल्या जातात आणि ग्राहकांना सामान भरण्यासाठी त्या दिल्या जातात. शहरात सर्वत्र हीच स्थिती आहे. याचबरोबर नगर परिषद क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकयुक्त कचरा संकलित होत असल्यावरून त्याचा वापर दिसून येतो. सर्वच पातळय़ांवर प्लास्टिक बंदीचा फज्जा उडालेला असताना अन्य कामांची जबाबदारी असल्याने प्लास्टिक बंदीकडे दुर्लक्ष होत आहे.
अतिरिक्त कामांमुळे दिरंगाई
पालघर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्लास्टिक बंदीची अमलबजावणी होणे अपेक्षित आहे मात्र आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना विविध पदांचे अतिरिक्त पदभार दिल्यामुळे, नेमकी कोणती कामे करावीत या विवंचनेत अधिकाऱ्यांसह कर्मचारीवर्ग आहेत. सबब आता नगर परिषदेने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी बाह्यस्रोताद्वारे कायमस्वरूपी पथकाची नेमणूक करावी अशी मागणी समोर येत आहे.
प्लास्टिक बंदीसह इतर कारवाईंसाठी नियमित पथके तयार करणे आवश्यक आहे. सभेत हा विषय मंजूर झाला. आता यासाठी सर्वंकष समिती स्थापन झाल्यानंतरच नियमित कारवाई पथके स्थापन होतील, अशी आशा आहे.
– अक्षय संखे, सभापती, आरोग्य समिती, पालघर नगर परिषद
