नववर्ष स्वागतात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई, खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन
पालघर: जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे तसेच विविध ठिकाणी सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. करोनाचा वाढता प्रभाव पाहता पोलीस यंत्रणा पर्यटनस्थळे व जल्लोषाच्या ठिकाणी नजर ठेवून आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांवर पोलिसांची करडी नजर असून जिल्ह्यातील ८५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. याचबरोबरीने पोलिसांची पथके प्रत्येक पोलीस ठाण्याच्या परिसरात गस्त घालणार आहेत. हॉटेल, लॉजेस, सभागृह, पर्यटनस्थळे यावर नजर ठेवणे तसेच अवैध दारू, अमली पदार्थ, गुटखा अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठीही वेगवेगळी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली अपर पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपअधीक्षक, ४३ पोलीस अधिकारी व ५४३ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी आहे. नवीन वर्ष स्वागतासाठी पाचपेक्षा जास्त जण एकत्र जमल्यास कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी नागरिकांना सूचित केले आहे. पर्यटनस्थळावर, उद्यान, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी पालघर पोलीस दलाकडून डिजिटल व्हिडीओ कॅमेऱ्याची नजर राहील. नववर्षांच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. फटाक्याची अतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मद्यपान करून वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी वावरणे, यावर कारवाई केली जाणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
वसईत पोलिसांची पथके
वसई विरार परिमंडळ २ व ३ यांच्या मार्फत एकूण १०४ अधिकारी, ३४३ पोलीस कर्मचारी, ६१ होमगार्ड, १ आर सी पी, १ सीआरपीएफ इतक्या पोलिसांचा फौज फाटा तैनात केला जाणार आहे. या पथकाकडून बार, रेस्टॉरंट, उपाहारगृहे, वसईचा किल्ला परिसर, समुद्र किनारे, गर्दीची ठिकाणे अशा ठिकाणी फिरत्या पथकाद्वारे लक्ष दिले जाणार आहे. तर विविध ठिकाणी नाकाबंदीही लावण्यात येणार आहे. तर या दिवशी बेकायदा दारू विक्री, वाहतूक केली जाते तर काहीजण मद्यपान करून वाहने चालवितात त्यामुळे अपघाताचे प्रकार घडतात अशा नशेबाजावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. अशी माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपा-आयुक्त संजयकुमार पाटील, व परिमंडळ ३ चे पोलीस उप-आयुक्त प्रशांत वाघुंडे यांनी दिली आहे.