प्रसुती दरम्यान गुंतागुंत असण्याची शक्यता वर्तवून सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातून पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलेला हलविले जात असताना तिची प्रसूती रुग्णवाहिकेमध्ये सुखरूपपणे करण्यात आली. १०८ रुग्णवाहिकेत प्रसूती होण्याचे प्रकार अजूनही सुरू असून अशा प्रकरणात पुढील उपचारासाठी पाठवणारे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्धकारवाई करण्याची आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे.

सफाळा परिसरात राहणारी विधी सांबरे (२५) ही दुसऱ्या खेपेला गरोदर असताना तिला सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात १ सप्टेंबरच्या रात्री दाखल करण्यात आले होते. तिच्या प्रसूती दरम्यान गुंतागुंत होण्याची शक्यता पाहता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या गर्भवती महिलेला पालघर येथे हलवण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला मध्यरात्रीनंतर २.५० वाजल्याच्या सुमारास कॉल देण्यात आला. या महिलेला १०८ रुग्णवाहिकेतून पालघरकडे नेले जात असताना तिला प्रसूती कळा जाणवल्याने रुग्णवाहिकेत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुकसाना शाउख यांनी या महिलेची सुखरूप प्रसुती केली या महिलेला २.८०० किलोग्राम वजनाचे अपत्य (मुलगी) झाली असून बाळ बाळंतीन सुखरूप पासून तिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पालघरच्या दौऱ्यावर आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर आले असताना गुंतागुंतीचे प्रसुती प्रकरण समजून पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्यात येत असताना रुग्णवाहिकेत सुखरूप प्रसुती झाल्यास पुढील उपचारासाठी पाठवणाऱ्या (रेफरल करणाऱ्या) वैद्यकीय अधिकाराविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र त्यानंतर देखील जिल्ह्यात गर्भवती महिलांना वरिष्ठ आरोग्य संस्थांमध्ये हलवण्याच्या प्रक्रियेत प्रसूती होण्याचे प्रकार सुरूच राहिले असून आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेकडे पालघर जिल्हा प्रशासन आवश्यक गांभीर्याने पहात नसल्याचे दिसून आले आहे.