पालघर: गणेशोत्सवाचा उत्साह ओसरल्यानंतर आता संपूर्ण पालघर जिल्ह्याला नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या उत्सवासाठी सार्वजनिक मंडळे, गृहसंकुले आणि बाजारपेठांमध्ये लगबग सुरू झाली असून मंडप उभारणी आणि सजावटीच्या कामांनी वेग घेतला आहे. यंदा आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे असणार आहे, ज्यामुळे भाविकांमध्ये अधिक उत्साह आहे. यासह गेल्या काही वर्षांमध्ये सुरू असलेल्या नऊ रंगाच्या ट्रेंडच्या अनुषंगाने महिलावर्ग नऊ दिवस कोणत्या साड्या नेसणार किंवा कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करणार या नियोजनात व्यस्त आहे.

नवरात्रोत्सवाला अवघे पाच दिवस बाकी असताना पालघर, बोईसर सह ठिकठिकाणी मंडप उभारणीची कामे सुरू आहे. गणेशोत्सवासाठी उभारलेल्या काही मंडपांमध्येही देवीची प्रतिष्ठापना करण्यासाठी जुनी सजावट बदलून नवरात्रीला साजेशी सजावट केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मंडप उभारणीच्या कामांना थोडा अडथळा येत असला तरी वॉटरप्रूफ मंडप टाकून आयोजक कोणत्याही परिस्थितीत गरबा आणि दांडियासाठी सज्ज होत आहेत. विशेषतः मोकळ्या मैदानांमध्ये वाळू पसरवण्याचे काम पावसाने खोळंबले आहे, ज्यामुळे आयोजकांची चिंता वाढली आहे. मात्र तरीही उत्साह कायम आहे.

पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित असल्याने यंदाच्या नवरात्रीला राजकीय रंग चढलेला दिसतो आहे. विविध राजकीय पक्षांनी मोठ्या गरबा रास आणि दांडिया रास कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शहरात ठिकठिकाणी कमानी आणि फलक लावण्यात आले असून त्यावरून राजकीय पक्षांचा वाढता सहभाग स्पष्ट दिसून येत आहे.

बाजारपेठांमध्ये खरेदीची गर्दी

नवरात्रोत्सवाच्या तयारीमुळे शहरातील बाजारपेठांमध्ये रौनक आली आहे. रंगीबेरंगी चनिया चोली, बांधणीच्या ओढण्या, केडिया आणि नक्षीदार दांडियाने बाजार सजले आहेत. यासोबतच ऑक्सिडाइज्ड दागिने, घटस्थापनेसाठी लागणारे मडके, बांबूच्या परड्या आणि सजावटीचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पारंपरिक दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे, ज्यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

नवरंगांची क्रेझ कायम

गेल्या काही वर्षांपासून नवरात्रीत प्रत्येक दिवशी एका विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. महिलांमध्ये यावर्षीच्या नवरंगांनुसार साड्या आणि कपड्यांचे नियोजन सुरू झाले आहे. या परंपरेमुळे महिलांमध्ये एकतेची आणि समानतेची भावना निर्माण होते. त्यामुळे विविध कार्यालये, सोसायट्या आणि मंडळांमध्ये नऊ दिवसांसाठी कपड्यांच्या रंगांचे नियोजन सुरू आहे.

यावर्षीचा नवरात्रोत्सव

सोमवार २२ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत असून ती १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी केली जाईल. यंदाच्या दहा दिवसांच्या उत्सवासाठी भाविक मोठ्या उत्साहात तयारी करत आहेत. ठिकठिकाणी देवीच्या मूर्ती बनवण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.