पालघर : पालघर शहरातील शहरी व औद्योगिक भागात करोना संसर्ग वाढला असून जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागातील शहरी भागातील बहुतांश ठिकाणी प्राथमिक शाळा बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी दिले. पालघर जिल्ह्यातील करोना रुग्ण वाढ (संसर्ग) दर ९.४ इतका असून ग्रामीण जिल्ह्यात सध्या १८३९ पेक्षा अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. लहान मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये याबाबत विचार करून वसई- विरार महानगरपालिका हद्द, पालघर व डहाणू नगर परिषद हद्दीमधील त्याचप्रमाणे वाडा तालुक्यातील कुडूस तर पालघर तालुक्यातील बोईसर, सरावली, खैरेपाडा, कुंभवली, पाम, सालवड, पास्थळ, बेटेगाव, नवापूर, कोलवडे, मान या ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व माध्यमांच्या पहिली ते पाचवी शाळा बंद करण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.
शहरी भागातील अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष तपासणी करण्याऐवजी थेट खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू केले असल्याची माहिती पुढे येत आहे. खोकला, घसा दुखणे, ताप, अंगदुखी अशा लक्षणाचे अनेक रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या आढळून येत आहेत. कामानिमित्त प्रवास करणाऱ्या तसेच गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणाऱ्या नागरिकांमध्ये आजाराचा प्रसार होत असून आठवडा बाजार तसेच इतर बाजारपेठांमध्येदेखील गर्दीच्या माध्यमातून आजाराचा प्रसार होत असल्याचे दिसून आले आहे. शासनाने महाविद्याालय बंद करण्याचे आदेश देण्यापूर्वी पालघर जिल्हा प्रशासनाने शिशुवर्ग बंद केले होते. जिल्हा प्रशासनाने आता नागरी व औद्योगिक क्षेत्रामधील प्राथमिक शाळा बंद केल्या असून ज्या ठिकाणी आजाराचा प्रसार वाढेल, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार उपाययोजना म्हणून शैक्षणिक संस्था बंद करायची निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
