पालघर :पालघर जिल्ह्यात वाढवण व मुरबे येथे होऊ पाहणारी बंदर व केळवे परिसरात उभारण्यात येणारे रिलायन्स टेक्सटाईल पार्क च्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात तांत्रिक रोजगार निर्मिती होणार आहे. या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्यातील आयटीआय केंद्र व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या माध्यमिक शाळांच्या प्रयोगशाळा अध्यायवत करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रयोगशाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील १५ दिवसात अंदाजपत्रक तयार करून शासकीय मंजुरी घेऊन पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत विद्यार्थ्याला अद्ययावत उपकरणां चा आधार घेऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न होणार आहे
पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यातील १० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि चार शासकीय तांत्रिक विद्यालय (जीटीएचएस) यांची आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पालघर कार्यालयात २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसाठी महेशकुमार सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पालघर यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व आयटीआय व जीटीएचएस संस्थांच्या बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकांबाबत विनंती केली. DAKSHA आणि MAHADRVSHTH प्रकल्पांतर्गत आवश्यक निधी आणि अंदाजपत्रके तात्काळ मिळावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच जिल्ह्यातील सर्व आयटीआय व जीटीएचएस संस्थांच्या बांधकामाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी भविष्यातील वाढवण बंदर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहणार असल्यामुळे, त्याअनुषंगाने संस्थांमध्ये व्यवसाय व तुकड्यांची वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे नविन बांधकामे, नूतनीकरण व विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली अंदाजपत्रके त्वरित उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी विनंती करण्यात आली. बांधकाम व संनियंत्रण मूल्यमापन समिती अंतर्गत जिल्ह्यातील प्रपत्र अ आणि ब यांवरील माहिती वेळेवर देऊन आवश्यक स्वाक्षऱ्या कराव्यात, असेही सुचवण्यात आले.
वाढवण बंदर व इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता, पालघर व वाणगाव येथील आयटीआय संस्थांच्या परिसरात वाहतूक वाढत आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वेळीच स्पीड ब्रेकर बसवावेत व धोकादायक क्षेत्रांवर सूचना चिन्हे लावावीत, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. या अनुषंगाने महेंद्र किणी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना १५ दिवसांत सर्व आवश्यक अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना दिल्या आणि तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस पालघर, डहाणू, तलासरी व वसई येथील उपकार्यकारी अभियंते, कनिष्ठ अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार तसेच जिल्ह्यातील सर्व आयटीआय व जीटीएचएस संस्थांचे प्राचार्य, गटनिदेशक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.