scorecardresearch

‘झांझरोली’च्या दुरुस्तीसाठी २.७६ कोटी ; धरणाच्या भगदाड दुरुस्तीचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करणार

केळवे रोड येथील झांझरोली धरणाला पडलेल्या भगदाड दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले असून हे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

पालघर: केळवे रोड येथील झांझरोली धरणाला पडलेल्या भगदाड दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले असून हे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी पावणेतीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून धरणातून पाणी विसर्ग होणारी पद्धत पूर्णपणे बदलण्यात येणार आहे.
केळवे रोड पूर्वेकडील एका नैसर्गिक नाल्यावर घळ भरणी करून १९८१ मध्ये धरण पूर्ण करण्यात आले होते. ८४० मीटर लांबी व १७.८० मीटर लांबी असणाऱ्या या धरणाचे ७.०४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. या धरणात ३.३३९ दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. या योजनेतील धरणाच्या डाव्या बाजूस ६१ मीटर लांबीचा विनादरवाजाचा सांडवा असून त्यामधून महत्तम पूर विसर्ग २०७ घनमीटर प्रतिसेकंद इतकी क्षमता होती.
झांझरोली धरणाच्या भिंतीमध्ये पडलेले लहानसे भगदाड ८ जानेवारी २०२२ रोजी आकाराने अचानक मोठे झाल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे धरणाला धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर झांझरोली धरणातून पाण्याचा विसर्ग होणाऱ्या विहिरीमधून गळती झाल्याचे आढळून आले. भगदाडामुळे धरणाला धोका निर्माण झाला असल्याने गळती झालेल्या पाण्याचा विसर्ग करणाऱ्या विहिरीला मुरूम मातीचा भराव टाकून अलिप्त करण्यात आले होते.
धरणातील पाण्याची पातळी कमी करून दुरुस्तीचे काम २६ एप्रिल रोजी हाती घेण्यात आले असून या विहिरीद्वारे पाणी विसर्ग करण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात येऊन काँक्रीट पाइपचे मुख्य विमोचक काढून टाकण्यात आले आहे. त्याऐवजी त्याच ठिकाणी धरणांमध्ये लोखंडी पाइप टाकून त्यावर सिमेंट काँक्रीटचे आवरण (केसिंग) करून त्यावर दोन बटरफ्लाय वॉल्व बसवून पाणी सोडण्याची व्यवस्था नव्याने उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे साठ फुटांच्या लांबीची ही नवीन व्यवस्था उभारण्याचे काम सुरू असून या कामासाठी पावणेतीन कोटी रुपयांचा खर्च अंदाजित आहे. हे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्याचा पाटबंधारे विभाग प्रयत्न करत आहे. सध्या धरणांमध्ये ०.३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून हा पाणीसाठा पुढील दोन-तीन महिन्यांपुरता पुरेसा आहे, असे सांगण्यात आले.
लघु पाटबंधारे योजनेच्या लाभार्थीचे हाल
माहीम- केळवा लघु पाटबंधारेयोजनेअंतर्गत असणाऱ्या १९ गावांना धरणातून पाण्याचा विसर्ग थांबल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. जिल्हा परिषदेने तरंगणाऱ्या व्यवस्थेवर आधारित पंपिंग प्रस्तावित केले असून या प्रस्तावाला २७ एप्रिल रोजी प्रशासकीय मंजुरी प्राप्त देण्यात आली आहे. या प्रकरणात निविदा काढण्यात आली असून हंगामी व्यवस्था कार्यरत होण्यासाठी अजून किमान १५ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे खर्चीक ठरणारे असून संबंधित ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती पाहता सुमारे एक ते सव्वा लाख नागरिकांना मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ापर्यंत तहानलेले राहावे लागेल अशी परिस्थिती आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Repair zanjaroli dam breach repair work completed monsoon irrigation department amy

ताज्या बातम्या