पालघर : पालघर जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतींपैकी १४४ ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंद करण्याबाबत ठराव संमत केला आहे. विक्रमगड व मोखाडा तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतींनी हा ठराव संमत केला असून जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये या प्रकारचा ठराव सर्व ग्रामपंचायतींमध्ये संमत होण्याबाबत जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा केला जात आहे.

समाजातील विधवा प्रथा व त्यासंदर्भातील अनिष्ट चालीरीतींचे निर्मूलन करण्यासाठी राज्य सरकार तसेच महिला आयोगाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. त्या अनुषंगाने पालघर जिल्हा परिषदेतर्फे स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पतीच्या निधनानंतर तिचे कुंकू, मंगळसूत्र, बांगडय़ा फोडणे, जोडवी काढणे अशा प्रथा अजूनही समाजात पाळल्या जात असून सरकारने विधवा प्रथा बंदीसंदर्भात निर्णय घेतला आहे.

जव्हार तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींपैकी २६ ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव संमत करण्यात आला असून वाडा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींपैकी १३, डहाणू तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींपैकी आठ, पालघर तालुक्यातील १३३ ग्रामपंचायतींपैकी २१, तलासरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींपैकी एक तर वसई तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींपैकी सहा ग्रामपंचायतीमध्ये ठराव संमत झाला आहे. जिल्ह्यात विधवा प्रथा बंदीसाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ठराव घेण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पाठपुरावा केला जात असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी दिली आहे.

काही समाजांकडून विधवा प्रथेत बदल

पालघर : पालघर जिल्हा हा सागरी, नागरी व डोंगरी असा विभागलेला असून या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळय़ा समाजांमध्ये वेगवेगळय़ा प्रथा पाहिल्या जातात. जिल्ह्यातील सागरी व नागरी भागातील काही समाजांनी विधवा प्रथा यापूर्वीच बंद केल्या असून या समाजातील विधवा महिला मंगळसूत्र परिधान करत असून कुंकूदेखील लावत असल्याचे दिसून आले आहे. मात्र काही समाज आणि अजूनही पारंपरिक पद्धती जपल्या असून या ठरावामुळे समाजामधील विधवा चालीरीतींमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल होतील असा आशावाद निर्माण झाला आहे.