कामाच्या ठिकाणीच भोजन; माशा, उंदरांचा प्रादुर्भाव
पालघर : पालघर जिल्हा मुख्यालय सुरू होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला असला तरीही या तिन्ही प्रमुख इमारतीमधील उपाहारगृह अजूनही बंद असल्याने येथील कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या अल्पोपाहाराचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय अनेक कर्मचारी कामाच्या ठिकाणी जेवण करीत असल्याने कार्यालयात माशा व उंदरांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.
सप्टेंबर पालघर जिल्हा मुख्यालय संकुलातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय सुरू करण्यात आले. या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम त्यांच्या कामाच्या ठिकाणी दुपारचे जेवण करण्यास प्रतिबंध करण्यात येत होते. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने काही दिवसांनंतर या तीनही कार्यालयातील कर्मचारी कार्यालयातच नाश्ता, जेवण व चहा पिऊ लागले. या तीनही कार्यालयात उपाहारगृहांची दालने असून सध्या ही सर्व उपाहारगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. उपाहार चालवण्यासाठी ठेकेदार नेमताना महिला बचत गटांना प्राधान्य द्यावे तसेच उपाहारगृहाच्या निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा परिषदेला पाचारण करण्यात यावे असे ठरविण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून या प्रक्रियेतील नियमावलीला अंतिम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आठवडा अखेरीस प्रक्रिया राबवण्यात येईल असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. त्यानंतर उपाहारगृह सुरू करण्यासाठी किमान महिन्याभराचा अवधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तसेच कर्मचाऱ्याना सुमारे एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खाद्यपदार्थाच्या टपऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. कार्यालयात सध्या खासगी व्यक्ती चहा वितरित करताना दिसून येत आहे. कार्यालयात कचरापेटीत टाकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थ तसेच चहाचे कपांवर माश्या, उंदीर व झुरळांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे.
