कासा : गेल्या पाच वर्षांपासून चारोटी ते महालक्ष्मी मंदिर मार्गावरील सेवा रस्त्याचे काम रखडले आहे. आयआरबी कंपनीने सुरू केलेले हे काम पाच वर्षे उलटून गेली तरी झालेले नाही. या अपूर्ण कामामुळे महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी महालक्ष्मी यात्रेदरम्यान मंदिरापासून महामार्गावर येणाऱ्या वाहनाचा गंभीर अपघात होऊन अनेकजण गंभीर जखमी झाले होते. तत्कालीन आमदार अमित घोडा यांनी चारोटी टोल नाक्यावर मोठे आंदोलन करत चारोटी नाका ते महालक्ष्मी मंदिर असा दोन्ही बाजूने स्वतंत्र सेवा रस्त्याची मागणी केली होती. आयआरबी कंपनीने सदर मागणी मंजूर करत कामाला सुरुवातही केली. मात्र कुठे माशी शिंकली कळले नाही. आजतागायत हे काम अर्धवटच आहे. चारोटी नाका ते अल्फा हॉटेल दरम्यान दोन्ही बाजूनी सेवा रस्ता बांधण्यात आलेला आहे. तोही सलग नसून ४००-४५०मीटरचे पट्टे तयार केले आहेत. त्यावरील पुलांचे काम अर्धवट आहे. विरुद्ध बाजूचा मल्लिका हॉटेल ते चारोटी नाका हा सेवा रस्ता ३००मीटरचाच बनवलेला आहे.
दोन वर्षांनंतर यंदा महालक्ष्मी यात्रा सुरू होते आहे. यात्रा कालावधीत पालघर जिल्हा, नाशिक, गुजरात, मुंबई अशा अनेक ठिकाणांहून भाविक यात्रेला येतात. त्यावेळी साहजिकच वाहतूक कोंडी होतेच. परंतु अशा कोंडीतून आणि वाहनांच्या मोठय़ा संख्येमुळे होणारे अपघात टाळण्यासाठीच या सेवा रस्त्याचे नियोजन केले होते. पाच र्वष होऊनही हा रस्ता पूर्ण नाहीच. त्यामुळे चारोटी नाका ते महालक्ष्मी मंदिर हा सेवा रस्ता तात्काळ पूर्ण करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
पाच वर्षांपूर्वी महालक्ष्मी मंदिर परिसरात अपघात होऊन अनेक जण जखमी झाले होते. त्यावेळेस मी शेकडो नागरिकांसह आंदोलन केले असता आयआरबीने चारोटीनाका ते महालक्ष्मी मंदिर या भागात दोन्ही बाजूंना सेवा रस्ता बांधण्याची हमी दिली. मात्र सुरुवातीचे थोडेसे काम केल्यानंतर बाकीचे काम अद्याप रखडलेलेच आहे. आयआरबीने हे काम पूर्ण केले नाही तर पुन्हा एकदा आम्ही टोलबंद आंदोलन करणार आहोत.-अमित घोडा, माजी आमदार, डहाणू