पालघर : “संतांनी अध्यात्माचे खऱ्या अर्थाने उपयोजन केले. लोकांना लोकांच्या भाषेतच अध्यात्म समजावले” आणि खऱ्या अर्थाने समाजात नैतिकता रुजवली असे प्रतिपादन डेक्कन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. प्रज्ञा सुहास कुलकर्णी यांनी केले.
९ जुलै रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सोनोपंत दांडेकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. “समकालीन विद्यार्थी आणि संत साहित्य” या विषयावर डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
संत आणि भगवंत यातील भेद सांगत कुलकर्णी यांनी चाणक्यापासून ते समर्थ रामदासांपर्यंत संतांचे लोकोपयोगी विचार उपस्थितांसमोर मांडले. परंपरा पुढे नेताना त्यातील ताज्यता कळली पाहिजे. आंतरिक पातळीवर आपण सुंदर झालं पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सोनूमामांच्या उत्तम मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ या पैलूंवर प्रकाश टाकला.
मामासाहेबांच्या शिक्षण विषयक स्वप्नांचा पालघरवासीयांनी आदर केला आहे, त्यांच्या कृतज्ञतेत राहिले आहेत असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे यांनी केले. माणसात एक परिपूर्ण व आदर्श माणूस म्हणून बदल होत नाहीत तोपर्यंत संत साहित्य अजरामर राहील असा विचार अध्यक्षीय समारोपात सुधीर दांडेकर यांनी मांडला. सोबत त्यांनी सुख, आनंद, यश या संकल्पनांवर विविध दाखल्यांसह प्रकाश टाकला. तसेच चारित्र्यनिर्माणाचे महत्व अधोरेखित केले.
संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप वारैय्या, विश्वस्त प्रा. अशोक ठाकूर, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी आणि अनिल पाटील, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा तसेच संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.